नागपूर : रक्त तपासणीचा अहवाल कधी मिळेल वॉर्डात? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Government hospital blood samples taken directly from ward process not in progress

नागपूर : रक्त तपासणीचा अहवाल कधी मिळेल वॉर्डात?

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) रुग्णांच्या रक्ताचे नमुने थेट वॉर्डातूनच तंत्रज्ञांमार्फत घेतले जातील. वॉर्डात भरती असलेल्या रुग्णाच्या खाटेवरच रक्ताच्या तपासणीचा अहवाल पोहोचेल अशी योजना तयार करण्यात आली होती. त्यासाठी स्वतंत्र परिचर नेमण्यात येणार होते, परंतु मेडिकल प्रशासनातर्फे सुरू करण्यात येणाऱ्या या अभिनव योजनेचा नारळच फोडला गेला नसल्याची माहिती पुढे आली आहे.

मेडिकलमध्ये मोठ्या प्रमाणात खासगी पॅथालॉजीच्या एजंटचा सुळसुळाट आहे. थेट वॉर्डात खासगी पॅथालॉजीचे तंत्रज्ञ पोहचतात, रुग्णाचे रक्त काढून तपासणीसाठी घेऊन जातात. ही बाब मेडिकल प्रशासनाच्या निर्दशनाला आल्यानंतर तत्कालिन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी मध्यवर्ती चिकित्सा रक्त तपासणी प्रयोगशाळेच्या सहकार्यातून रक्त तपासणीचा हा अभिनव उपक्रम राबविण्याची योजना तयार केली.

दर दिवसाला मेडिकलमध्ये रक्त, मल मुत्र तपासणीच्या २ हजारावर चाचण्या होतात. या उपक्रमामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना रक्त तपासणी प्रयोगशाळेत वारंवार अहवालासाठी खेटा घालण्याचा त्रास कमी होणार होता. याशिवाय खासगी प्रयोगशाळेशी असलेले येथील डॉक्‍टरांचे लागेबांधे पुढे येणार होते, परंतु नागपूरच्या मेडिकलमध्ये पहिल्यांदा राबवण्यात येणारा हा उपक्रम सुरूच झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आशिया खंडात गौरवशाली परंपरा असलेल्या मेडिकलवर मोठ्या प्रमाणात ठपका ठेवला जात आहे. येथील डॉक्‍टरांचे खासगी पॅथॉलॉजीशी लागेबांधे असून, रुग्णांना रक्त तपासणीसाठी थेट खासगीचा रस्ता दाखवला जातो. यामुळे मेडिकलची प्रतिष्ठा दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिसून आले. यामुळेच मेडिकलची गौरवशाली पंरपरा पुन्हा परत आणण्यासाठी तत्कालिन वैद्यकीय संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांच्या मार्गदर्शनात सचिव मनीषा म्हैसकर यांच्या सहकार्यातून हा प्रकल्प डॉ. निसवाडे यांनी तयार केला होता, परंतु त्याची अंमलबजावणीच झाली नाही.

१००० रुग्ण भरती

दर दिवसाला अडिच हजारांवर बाह्यरुग्णांची नोंद होते. तर, १००० रुग्ण भरती वॉर्डात भरती असतात. या बाह्यरुग्ण तसेच आंतररुग्णांना रक्त तपासणीसाठी रुग्णांच्या नातेवाइकांना मेडिकलमधील पॅथॉलॉजीमध्ये रक्त तपासणीसाठी खेटा घालाव्या लागतात. रक्त तपासणीचा अहवाल (रिपोर्ट) प्राप्त करण्यासाठीही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.

मेडिकलच्या मध्यवर्ती रक्त तपासणी प्रयोगशाळेत (सेंट्रल क्‍लिनिकल लेबॉरेटरी) रक्ताचे नमुने विखुरले असतात. एका छताखाली सर्व तपासणीतून अहवाल मेडिकलच्या वॉर्डात भरती रुग्णांपर्यंत पोहोचविण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांची निवड करण्यात येईल असे त्यावेळी सांगण्यात आले.

Web Title: Government Hospital Blood Samples Taken Directly From Ward Process Not In Progress

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top