esakal | धो-धो पावसाने नागपूरकरांची दाणादाण; आणखी तीन दिवस येलो अलर्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Rain

धो-धो पावसाने नागपूरकरांची दाणादाण; आणखी तीन दिवस येलो अलर्ट

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : जवळपास आठवडाभरापासून विदर्भात मुक्कामी असलेल्या वरुणराजाने गुरुवारी पुन्हा उपराजधानीला जोरदार दणका दिला. मेघगर्जना व विजांच्या कडकडटांसह आलेल्या धुवांधार पावसाने नागपूरकरांची चांगलीच दाणादाण उडविली. जोरदार पावसामुळे जागोजागी पाणी तुंबले, अनेक घरांमध्ये पाणी शिरले. काही ठिकाणी झाडेही पडली. तासाभरात ३४ मिलिमीटर पाऊस बरसला. हवामान विभागाने आणखी तीन दिवस नागपूरसह विदर्भात येलो अलर्ट दिला आहे.

सौराष्ट्र व आजूबाजूच्या परिसरात निर्माण झालेल्या ‘सायक्लॉनिक सर्क्युलेशन’मुळे विदर्भात पुन्हा मॉन्सून सक्रिय झाला आहे. त्याचा तीव्र प्रभाव गुरुवारी दिसून आला. दुपारी तीनपासून शहरात जवळपास सगळीकडेच विजांच्या कडकडाटांसह धो-धो बरसला. पावसामुळे सखल भागांसह ठिकठिकाणी पाणी साचले होते. अनेक चौकांमध्ये गुडघाभर पाणी जमा झाले होते. नरेंद्रनगर पुलाखालीही कंबरेपर्यंत पाणी होते. त्यातून वाहने काढताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागली. अनेकांना पाऊस थांबेपर्यंत आडोशाचा आधार घ्यावा लागला.

हेही वाचा: चंद्रपूर : जादूटोणाच्या संशयावरून आणखी तिघांना मारहाण

वस्त्यांमध्ये पाणी, झाडेही पडली

झिंगाबाई टाकळी, नारा-नारीसह अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. काछीपुरा व सिव्हिल लाइन्स परिसरात झाडे व फांद्या पडल्याचे अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. नागपूर सुधार प्रन्यासच्या कार्यालयातही पाणी जमा झाले होते. याशिवाय शंकरनगर चौकात ड्रेनेज लाइन चोक झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती.

आणखी तीन दिवस इशारा

शहरात सायंकाळी साडेपाचपर्यंत ३४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. विदर्भात अमरावती, अकोला व वर्धा येथेही जोरदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. विदर्भात आणखी तीन दिवस जोरदार पाऊस राहणार आहे. तसा इशारा प्रादेशिक हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे. आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा खरीप पिकांना फायदा होणार आहे. शिवाय जलसाठेही तुडुंब भरण्याची शक्यता आहे.

loading image
go to top