
नागपुरात हुक्का पार्लरची ‘धूम’; धरमपेठ, अंबाझरी, जरीपटका ‘हॉट’
नागपूर : युवा पिढी हुक्क्याच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होऊ नये, या उद्देशाने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सर्वच हुक्का पार्लर बंद करण्याचे आदेश दिले होते. परंतु, धरमपेठ, अंबाझरी, फुटाळा आणि जरीपटक्यातील काही हुक्का पार्लरच्या मालकांनी पोलिस ठाण्यातील काहींना हाताशी धरून बिनधास्त हुक्का पार्लर सुरू केल्याची चर्चा आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शहरात सध्या रात्री १० वाजेपर्यंत सर्व रेस्ट्रॉरेंट उघडे ठेवण्याची अनुमती आहे. या फायदा घेऊन कॉफी हाउस व रेस्ट्रोच्या नावाने शहरातील हुक्का पार्लर मोठ्या प्रमाणात सुरू झाले. स्थानिक पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि गुन्हे शाखेच्या युनिटमधील काहींना हाताशी धरून हुक्का पार्लर सर्रासपणे सुरू असल्याची माहिती आहे.
अनेक हुक्का पार्लर चालवणारे आपण हर्बल फ्लेवर वापरत असल्याचा दावा करतात. परंतु, हुक्का पार्लरमध्ये येणारे बहुतांश तरुण-तरुणी या नशा करण्यासाठी येत असून त्यात हर्बलच्या ऐवजी अंमली पदार्थांचाच वापर करण्यात येते. शहरातील सर्वाधिक हुक्का पार्लर सदर व धरमपेठ परिसरात आहेत. याशिवाय जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतही अनेक हुक्का पार्लर सुरू झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत हुक्का पार्लर सुरू असतात अशी चर्चा आहे.
पोलिसांचे दुर्लक्ष
सदरच्या रेसिडेंसी मार्गावर ग्रिला, चारकोल, मंगळवारी कॉम्प्लेक्समध्ये पाईपिन, अंबाझरी पोलिस ठाण्यांतर्गत स्पेड्स, लाऊंज आणि विला हे रात्री उशिरापर्यंत सुरू असतात अशी चर्चा आहे. जरीपटका पोलिस ठाण्यांतर्गत हेडक्वॉर्टर, बजानगर अंतर्गत ओकलवूड आणि प्रतापनगर-हिंगण टी पॉईंटवर ‘सी टू’ पार्लर असल्याची माहिती आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे.