esakal | Video : भुकेला पाठिशी बांधून बिहारकडे पायी निघाला मजुरांचा काफिला 
sakal

बोलून बातमी शोधा

bihar labours

केंद्र सरकारचा धिक्कार करीत हे स्थलांतरित मजूर हजार दोन हजार किलोमीटरचा प्रवास पायी करीत आहेत. त्यांच्यासाठी ना बस ना रेल्वे...यावरून हे सरकार श्रीमंत लोकांच्या बाजूने असल्याचीच भूमिका वठवित असल्याची भावना सहज लक्षात येते. वयाची विशी-पंचेविशीतीले 14 ते 15 कामगार हैद्राबादेत एका बांधकाम कंपनीत कामाला होते.

Video : भुकेला पाठिशी बांधून बिहारकडे पायी निघाला मजुरांचा काफिला 

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : आठ दिन पहले मेडिकल टेस्ट हुयी साब...ये अंग्रेजी पत्र मिला. लेकिन हमे रोडपर बिठाके रखे, रातको खुले आसमान मे सोना, और सुबह रास्तेपर खाना....इसके सिवा कुछ नही मिला...हैद्राबाद से हम आये...आज जायेगी ट्रेन, कल जायेगी ऐसा बताकर आठ दिन रोका गया, लेकिन ना बस आयी ना ट्रेन...जाने दो साब, आठ दिनोंसे हर सुबह उगनेवाले सूरजको हात जोडता हूँ... लेकिन हमारे लिये ये सूरज सिर्फ आग का गोला बनके पेश आया....अशा भावना व्यक्त करीत, घरी परतण्यासाठी जीवावर उदार होऊन हैद्राबाद ते नागपूर असा प्रवास करणारे हे मजूर. डोक्‍यावर आग ओकणारा सूर्य अन्‌ पोटात भूक घेऊन काळ्या डांबरी रस्त्यावरून स्लिपर घालून चालताना त्यांचे पाय सुजले आहेत. तळपायाला फोडं आली...परंतु घराच्या ओढीनं पोटातल्या भुकेला पाठिशी बांधून उपाशीपोटी हा काफिला मजल दरमजल करीत बिहारच्या दिशेने निघाला. 

कोरोनाच्या विषाणूमुळे देश लॉकडाउन झाला. ज्यांच्याजवळ पासपोर्ट आहे, अशा विदेशी लोकांनी हा आजार आणला. आणखी विदेशात अडकलेल्या सत्तर हजारावर भारतीयांसाठी केंद्र सरकार विमान पाठवण्याची सोय करीत आहे. मात्र देशातील हातवरचं पोट असणाऱ्या मजुरांना घरापर्यंत पोहचवण्यासाठी फिजिकल फिटनेस मागते. मेडिकल फिट असूनही आठ दिवस रस्त्यावर थांबवून ठेवले आहे. 

केंद्र सरकारचा धिक्कार करीत हे स्थलांतरित मजूर हजार दोन हजार किलोमीटरचा प्रवास पायी करीत आहेत. त्यांच्यासाठी ना बस ना रेल्वे...यावरून हे सरकार श्रीमंत लोकांच्या बाजूने असल्याचीच भूमिका वठवित असल्याची भावना सहज लक्षात येते. वयाची विशी-पंचेविशीतीले 14 ते 15 कामगार हैद्राबादेत एका बांधकाम कंपनीत कामाला होते. यातील एक जण भंडारा जिल्ह्यातील आहे. तो मंगल. कवी मनाचा हा मंगल मध्येच कवितेतून सांगतो, हैद्राबादेत बांधल्या इमारती पण आम्हास नाही मिळाला निवारा...तरीही मालक म्हणतो, अश्रू ढाळूनी हसा...अशी आपली व्यथा व्यक्त करीत हे मजूर नागपुरात पोहचले. 

वर्धा मार्गावर आठ दिवसांपूर्वी पोलिसांनी अडवले. बिहारमध्ये पोहचवण्याचे वचन दिले. त्यासाठी फार्म भरून घेतला. वैद्यकीय तपासणी केली आणि आम्हाला थांबवून ठेवले. आठ दिवसांपासून वर्धा मार्गावरील खापरीनजीक हे मजूर मोकळ्या आकाशाखाली थांबून आहेत. दिवसा कोणी संस्थेतर्फे जेवण आणून दिले तरच पोटाची भूक भागते. नाहीतर पोटात पेटलेली आग केवळ पाणी पिऊन विझवल्याचे दुःख हे मजूर व्यक्त करतात. कोरोनामुळे हातचे काम गेल्याने बिहारकडे निघालेल्या या मजुरांनी साडेपाचशे किलोमीटरच्या प्रवासाचा पल्ला पायी गाठला. तीन वर्षांपासून हैद्राबाद येथे एका बांधकाम कंपनीत कामाला होते. रिकाम्या फ्टॅटमध्ये एका हॉलमध्ये सारेच मजूर राहात होते. सात दिवसांपुर्वी हैद्राबाद महामार्गाने पायी निघाले होते. 

हे तर मरणाला आमंत्रण, कोरोना काळात घरपोच दारू नकोच!
 

इंग्रजीत फॉर्म.. 
वैद्यकीय माहिती भरण्यासाठी या मजुरांच्या हातात एक फार्म दिला आहे. या मजुरांनी हा फार्म भरायचा आहे. मात्र हे मजूर इंग्रजीत फॉर्म कसे भरणार. यामुळे जे डॉक्‍टर तपासणी करतात, त्यांच्याच कोण्या सहकाऱ्याकडून यांनी फॉर्म भरून घेतला. डॉ. कुश झुनझुनवाला यांची स्वाक्षरी असलेले फिटनेस फॉर्म यांच्याकडे आहे. तरीही त्यांच्यासाठी वाहन उपलब्ध न झाल्याने बिहारला पायी जाण्याचा निर्णय घेतला. पुढील 20 दिवस पायी चालून ते बिहारमध्ये पोहोचतील. पहाटेपासून सुरू झालेला दिवस रात्री कधी संपतो हे कळत नाही. रस्त्यात सावली दिसली की, पाणी पिण्यासाठी ते थांबतात. नागपुरातून पुढच्या प्रवासासाठी निघाले असताना नागपुरातील कार्यकर्त्यानी बिस्किटचे पॉकिट दिले. भूक लागली की, बिस्किट खाऊन पाणी पिऊन पुढच्या प्रवास ते करीत आहेत.

loading image