esakal | women's day special : अत्याचारांचे समुळ उच्चाटन करण्याचे ध्येय ठेऊन झाली आयपीएस
sakal

बोलून बातमी शोधा

Interview with IPS Vinita Sahu on Women Day

women's day special : अत्याचारांचे समुळ उच्चाटन करण्याचे ध्येय ठेऊन झाली आयपीएस

sakal_logo
By
अनिल कांबळे/अतुल मेहेरे

नागपूर : आयपीएस झाल्यानंतर नांदेडला सहायक जिल्हा पोलिस अधिक्षक होते. पुढील अभ्यास सुरूच होता. आयएएससाठी सिलेक्‍ट झाले होते. परंतु, समाजातील शोषित पीडितांवर गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून होणाऱ्या अत्याचारांचे समुळ उच्चाटन करण्याचे ध्येय होते. त्यामुळे आयपीएस म्हणून काम करण्याचे ठरवले. मला वर्दीचे आकर्षण आधीपासून होते आणि नांदेडच्या कारकिर्दीत ते अधिकच वाढले. विविध संकटांनी त्रस्त झालेले "डीस्ट्रेस' लोक पोलिसांकडे येतात. त्यांना न्याय मिळवून देण्यात समाधान मिळते. आयपीएसचे प्रशिक्षण हे देशातील सर्वश्रेष्ठ प्रशिक्षण आहे, असे नागपूर शहर झोन दोनच्या आयपीएस अधिकारी विनिता साहू "सकाळ'शी बोलताना म्हणाल्या. 

नागपूरमध्ये रुजू होण्यापूर्वी ग्रामीण भागातच काम केले. अधीक्षक म्हणून वाशिम, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये काम केल्याचा अनुभव होता. शहर आणि ग्रामीण पोलिसिंगमध्ये तफावत आहे. त्यामुळे नागपूरला येताना थोडे दडपण होते. कारण येथे व्हीआयपी मुव्हमेंट आहेत. विधानभवन, उच्च न्यायालय, संविधान चौक आहे. संवेदनशील प्रकरणांचे निकाल येथे लागतात. परंतु, पोलिस आयुक्त चांगले आहेत. सर्व सहकाऱ्यांना समजून घेऊन काम करण्याकडे त्यांचा कल असतो. त्यामुळे लवकरच नागपूरशी एकरूप झाल्याचे साहू सांगतात. 

जाणून घ्या - खवय्यांच्या ताटातून कोंबडी पळाली; तंगडी काही मिळेना!

महिला पोलिस अधिकाऱ्यांकडून महिलांना अपेक्षा मोठ्या असतात. त्यामुळे महिला सुरक्षेकडे विशेष लक्ष पुरविले. पोलिसांत तक्रार कशी करावी, याची देखील माहिती महिलांना नसते. त्यामुळे सर्वप्रथम त्यासाठी जनजागृती केली. सप्टेबर 2019 मध्ये "जागरुक मी व समाज' हा उपक्रम राबविला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. वाकर्स स्ट्रीट आणि बगीचे असामाजिक तत्वांचे लक्ष्य असतात. त्यामुळे अशा ठिकाणी दामिनी पथकांची पेट्रोलिग वाढविली. जाफनीज गार्डन आणि फुटाळा तलावाजवळची दुकाने रात्री 2-3 वाजेपर्यंत सुरू राहायची. ती आता 11 वाजता बंद होतात. त्यामुळे अर्धे काम हलके झाले. त्यानंतर तेथे फिस्क पॉइंट बनविला. आता गुन्हेगारी आटोक्‍यात असल्याचे विनिता म्हणाल्या. 

महिलादिनापासून शहरात "पोलिस दीदी'

शहरातील महिला आणि मुलींचे आत्मबल वाढविण्यासाठी जागतिक महिला दिनी "पोलिस दीदी' उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या दीदी महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असतील. याच धर्तीवर "पोलिस काका' उपक्रमसुद्धा विभागातर्फे सुरू करण्यात येणार असल्याचे विनिता यांनी सांगितले. नागपूर शहरात "भरोसा सेल' स्थापन करण्यात आले आहे. येथे महिलांच्या तक्रारी गांभीर्याने ऐकूण घेतले जातात. 

मुली, महिलांसाठी "होम ड्रॉप' योजना

पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी "होम ड्रॉप' योजना सुरू केली. शहरातील कोणत्याही मुलीला किंवा महिलेला रात्री नऊ वाजतानंतर घरी जाण्यास साधन उपलब्ध नसल्यास किंवा भीती वाटत असल्यास घरापर्यंत पोलिस पोहोचवून देतील. रात्रीच्या सुमारास एकट्या मुलींना भीती बाळगण्याचे कारण नाही. मुलींकडे दुचाकी जरी असली तरी दुचाकीसह घरी पोहोचवून देण्याची जबाबदारी पोलिसांची असेल. महिला सुरक्षिततेसाठी नागपूर पोलिसांनी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.

क्लिक करा - गृहमंत्री म्हणाले, शेतकरी आंदोलनकर्त्यांचे गुन्हे मागे घेणार...

महिला, मुलींसाठी टीप्स

तरुणींनी मनात भीती बाळगून समाजात वावरू नये. पालकांनीही मुलींनाच सारखे सल्ले देऊन कमजोर बनविण्यापेक्षा तिला ब्रेव्ह बनविण्याकडे लक्ष द्यायला हवे. संकट समयी काय करावे, याबाबत मुलींना माहिती द्यावी. पोलिसांचा शंभर डायल क्रमांक हा कॉंटॅक्‍ट लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर ठेवावा. जेणेकरून संकटकाळात लगेच पोलिसांची मदत घेता येईल. रात्री उशिरा रस्त्यावरून एकटे जाणे शक्‍यतो टाळावे किंवा एकटे जात असताना पालक किंवा नातेवाईकांच्या संपर्कात राहावे. 

मोबाईल नव्हे तर कुटुंबीयांकडे लक्ष द्या

आता प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला आहे. शाळकरी मुलीपासून ते अगदी भाजीपाला विक्री करणाऱ्यांकडे स्मार्ट फोन आहे. मात्र, स्मार्टफोन वापरण्याच्या मर्यादा प्रत्येकाने लक्षात घ्यायला हव्या. अनेक विवाहित महिला आपला अधिकाधिक वेळ वॉट्‌सऍप आणि फेसबुकवर घालवतात. त्यापायी मुलांकडे, पतीकडे आणि कुटुंबीयांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या काही तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे महिलांनी मोबाईलला एवढा वेळ दिल्यापेक्षा कुटुंबीयांकडे लक्ष द्यावे. 

दोन हात करण्याची क्षमता ठेवा

सध्याच्या युगात मुलींनी परफेक्‍ट असणे गरजेचे आहे. शालेय शिक्षणापासूनच मुलींना स्वरक्षणाचे धडे द्यायला हवे. मुलांप्रमाणे मुलींनाही खेळ आणि मैदानावर मोकळीक द्यायला हवी. मुलींना कराटे किंवा ज्युडोचे प्रशिक्षण द्यावे आहे. तसेच क्रीडा प्रकारात सहभागी होण्यास पालकांनी प्रोत्साहन द्यावे. तसेच संकटसमयी उपयोगासाठी मुलींनी पर्समध्ये पेपर स्प्रे, मिरची पावडर, नेल कटर ठेवण्यास काही हरकत नाही. परिस्थितीला न घाबरता दोन-दोन हात करण्याची क्षमता निर्माण होईल, यासाठी पालकांनी प्रयत्न करायला हवे. 

मुलं, मुलींना समान लेखा

पालकांनी मुले आणि मुलींना समान लेखावे. जेणेकरून हिनभावनेची घरातूनच सुरुवात होणार नाही. मुलींना सतत उपदेशाचे डोज पाजण्यापेक्षा त्यांच्या काय समस्या आहेत, त्या प्रेमाने समजून घ्या आणि त्यावर समाधान शोधा. कुणी त्रास देत असेल तर कुटुंबातील वरिष्ठांशी नंतर पोलिसांपर्यंत पोहोचा. मुलीकडून काय अपेक्षा करावी? असा प्रश्‍न विचारू नका. मुलाप्रमाणे तिलाही प्रेम द्या जेणेकरून समाजात वावरताना ती गर्वाने आणि मान ताट करून वावरेल.

loading image