esakal | सावधान! बळावतोय किडनी आजार
sakal

बोलून बातमी शोधा

kideney

यूके सारख्या देशात समाजाच्या सर्वात खालच्या टप्प्यातील व्यक्तींमध्ये किडनी विकार सधन लोकांच्या तुलनेत दुप्पट आहे. हीच परिस्थिती भारतात आहे. यावर्षी जागतिक किडनी दिनाचे घोषवाक्‍य किडनी विकारांचे पूर्वनिदानानंतर सर्वांना उपचाराची समान उपलब्धता असावी, असे आहे.

सावधान! बळावतोय किडनी आजार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : यवतमाळ जिल्हयात एकी गावात अज्ञात कारणामुळे किडनीविकार वाढत आहेत. या पार्श्‍वभूमीवर किडनी विकार तज्ज्ञांची संघटना असलेल्या "दी नेफ्रोलॉजी सोसायटी'तर्फे या अज्ञात कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्याचा संकल्प सोडण्यात आला. दोन्ही किडनी निकामी होत असल्याने येथील नागरिकांना शारीरिक, मानसिक, आर्थिक फटका बसत आहे. सामाजिक व आर्थिक परिस्थिती याला कारणीभूत आहे, असे मत ज्येष्ठ किडनीविकारतज्ज्ञ (नेफ्रोलॉजिस्ट) डॉ. धनंजय उखळकर यांनी आज व्यक्त केले.
दी नेफ्रोलॉजी सोसायटीचा वर्धापन दिन रविवारी आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. उखळकर म्हणाले, यूके सारख्या देशात समाजाच्या सर्वात खालच्या टप्प्यातील व्यक्तींमध्ये किडनी विकार सधन लोकांच्या तुलनेत दुप्पट आहे. हीच परिस्थिती भारतात आहे. यावर्षी जागतिक किडनी दिनाचे घोषवाक्‍य किडनी विकारांचे पूर्वनिदानानंतर सर्वांना उपचाराची समान उपलब्धता असावी, असे आहे. किडनी विकाराचे पूर्वनिदान झाले तर गंभीर अवस्थेपर्यंत पोहोचण्यापूर्वी उपचारातून बरा होऊ शकतो, यासाठी किडनी कार्यन्वयन तपासणी (किडनी फंक्‍शन टेस्ट) करवून घेणे आवश्‍यक असल्याचे डॉ. उखळकर म्हणाले. पत्रकार परिषदेला दी नेफ्रोलॉजी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अश्‍विनीकुमार खांडेकर, सचिव डॉ. निशांत देशपांडे, एपीआयचे अध्यक्ष डॉ. प्रफुल्ल कडू आणि सचिव डॉ.दीप्ती चांद, व्हीएपीएमचे अध्यक्ष डॉ. किशोर देशपांडे, वरिष्ठ नेफ्रोलॉजिस्ट डॉ. धनंजय उखळकर, डॉ. विरेश गुप्ता, डॉ. समीर चौबे, डॉ. शिवनारायण आचार्य, डॉ. विशाल रामटेके उपस्थित होते.

सविस्तर वाचा - तीन तासांचा पेपर दोन तासात सोडवला आणि प्रियकराबरोबर झाली फुर्रर्र

वर्धापन दिन सोहळा रविवारी
"दी नेफ्रोलॉजी' सोसायटीचा वार्षिक दिन समारोह रविवारी रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉइंट येथे सकाळी 9 वाजता होणार आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे चंदिगढ येथील नेफ्रोलॉजिस्ट डॉ. ऋतंभरा नाडा उपस्थित राहतील. लखनऊ येथील डॉ. अनिता सक्‍सेना विशेष अतिथी राहतील. "कॉम्लिमेंट ग्लोमेरुलोपॅथी' विषयावर डॉ. ऋतुंभरा नाडा विचार व्यक्त करतील. नागपुरातील किडनीविकार तज्ज्ञ डॉ. समीर चौबे यांना "डॉ. हर्षा सालकर प्रोफेशनल एक्‍सेलंस अवॉर्ड' प्रदान करण्यात येईल. आहारतज्ज्ञ डॉ. सुनीती खांडेकर आणि डॉ. रचना जसानी लिखित पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात येईल. डॉ. विरेश गुप्ता या पुस्तकावर भाष्य करतील. डॉ. सूर्यश्री पांडे यांच्या पुढाकारातून "जर्नल ऑफ दि नेफ्रोलॉजी सोसायटी'चे प्रकाशन होईल. शनिवारी (ता.14) विकृतीशास्त्र सोसायटीच्या सहकार्यातून चर्चासत्र होणार आहे. दिल्ली येथील बी. एल. कपूर इस्पितळातील नेफ्रापॅथोलॉजिस्ट डॉ. राजन दुग्गल मार्गदर्शन करतील. डॉ. शिवनारायण आचार्य संचालन करतील.

loading image