

College Romance Turns Lifelong Bond, Crossing Social Boundaries
Sakal
कॉलेज जीवनात अडकले ‘प्रेमाच्या बेडीत’; जाती-धर्माच्या चौकटीपलीकडचे प्रेम, फिरदोस-मेहवश यांची प्रेमकहाणी!
सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. १० : समाज अनेकदा प्रेमाकडे धर्म, जात आणि परंपरांच्या चौकटीतून पाहतो. मात्र, नागपूरचे वरिष्ठ विधिज्ञ फिरदोस मिर्झा आणि त्यांच्या पत्नी मेहवश मिर्झा यांची प्रेमकथा या सर्व चौकटी ओलांडणारी आहे. माणुसकी, परस्पर समज, संवाद आणि विश्वासावर उभे असलेले हे नाते खऱ्या प्रेमाची ताकद अधोरेखित करते. ‘लोक काय म्हणतील’ या भीतीपलीकडे जाऊन दोन्ही कुटुंबांनी या नात्याचा स्वीकार केला.
महाविद्यालयीन जीवनात फिरदोस मिर्झा आणि मंजूषा दुबे (पूर्वाश्रमीच्या) यांची पहिली भेट झाली. मंजूषा हिंदू तर फिरदोस मुस्लीम. सुरुवातीला फिरदोसची लाल स्कूटर आणि मोठ्या आवाजात वाजणारी गाणी मंजूषाला अजिबात आवडली नव्हती. मात्र, एका युथ फेस्टिव्हलदरम्यान फिरदोसने तिला नाटकात सहभागी होण्यास सांगितले आणि तिथून त्यांच्यात संवाद सुरू झाला. पुढे विविध शिबिरे आणि स्पर्धांमुळे भेटी वाढल्या. आवडी-निवडी जुळू लागल्या आणि तिथून त्यांच्या मैत्रीला नवे वळण मिळाले. ही मैत्री हळूहळू प्रेमात बदलली आणि दोन भिन्न पार्श्वभूमी असलेल्या व्यक्ती आयुष्यभराच्या सोबती ठरल्या.
मंजूषा नंतर मेहवश मिर्झा झाल्या आणि फिरदोस यांच्या संसाराच्या बेडीत कायमच्या अडकल्या. त्यांच्यासाठी आजही अविस्मरणीय क्षण म्हणजे फिरदोस वेळात वेळ काढून सिव्हिल लाइन परिसरातील एका बाकावर त्यांच्यासोबत तासभर गप्पा मारायचे, पायी फिरायचे आणि चहा-कॉफीचा आस्वाद घ्यायचे. आजही फिरदोस दर शुक्रवारी संध्याकाळी मेहवशसाठी आवर्जुन वेळ काढतात. दिवाळी आणि ईद हे सण त्यांच्या घरात समान उत्साहाने साजरे होतात. प्रेम हे वर्षातून एकदाच साजरे करायचे नसते, तर रोज जगायचे असते, असे फिरदोस यांचे म्हणणे आहे.
दोन्ही धर्मांचे प्रतिनिधी एकत्र
आंतरधर्मीय विवाहामुळे मेहवशच्या कुटुंबाला सुरुवातीला चिंता वाटली. ‘लोक काय म्हणतील’ आणि मेहवशला दुसऱ्या संस्कृतीत येणाऱ्या अडचणींबद्दल त्यांना काळजी होती. मात्र, दोन्ही कुटुंब एकमेकांना परिचित असल्याने त्यांनी या नात्याला पाठिंबा दिला. फिरदोसने सांगितले की, ३० वर्षांपूर्वी लोकांना त्यांच्या जाती-धर्मावरून नव्हे, तर व्यक्ती म्हणून पाहिले जात असे. त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला दोन्ही धर्मांचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि त्यांनी एकत्र जेवण केले. त्या काळात हा प्रसंग सामाजिक सलोखा आणि एकतेचे प्रतीक ठरला.
विशेष विवाह कायद्यात लग्न
फिरदोस आणि मेहवश यांनी धर्माचे भांडण नको म्हणून विशेष विवाह कायद्यानुसार लग्न केले. कारण विशेष विवाह कायदा आंतरधर्मीय विवाहांना कायदेशीर मान्यता देतो आणि व्यक्तिगत कायद्यांना बाजूला सारून समान नागरिक संहिता लागू करतो. या जोडप्याने नातेसंबंधात समान विचार शोधण्यावर आणि व्यक्तींना त्यांच्या पार्श्वभूमीचा विचार न करता माणूस म्हणून पाहण्यावर भर दिला.
नात्यांचे महत्त्व जपले
फिरदोस यांच्या आईने मेहवशला तिच्या भावाला राखी बांधण्यास सांगितले. यामागे ‘नवीन नात्यांसाठी जुनी नाती तोडू नये’ हा विचार होता. फिरदोस सांगतात की, त्यांच्या काळात नातेसंबंधात वचनबद्धता होती ‘ब्रेकअप’ ही संकल्पनाच नव्हती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.