esakal | वससी व्यापक रुपे तू स्थुलसुक्ष्मी! सोन पावलांनी ज्येष्ठागौरीचे घरोघरी आगमन
sakal

बोलून बातमी शोधा

mahalaxmi

ज्येष्ठा गौरींचे (लक्ष्मी) देखील मोठ्या थाटात, उत्साहात आणि सोन पावलानं घरोघरी आगमन झालं. या ज्येष्ठा गौरींचे आगमनासुळे महिलादेखील आनंदित आहेत.

वससी व्यापक रुपे तू स्थुलसुक्ष्मी! सोन पावलांनी ज्येष्ठागौरीचे घरोघरी आगमन

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : विघ्नहर्ता गणरायाचे धूमधडाक्यात आगमन झाल्यानंतर सर्वत्र आनंदोत्सवास प्रारंभ झाला आहे. याच आनंदोत्सवात आणखीन भर पडली असून ज्येष्ठा गौरींचे (लक्ष्मी) देखील मोठ्या थाटात, उत्साहात आणि सोन पावलानं घरोघरी आगमन झालं. या ज्येष्ठा गौरींचे आगमनासुळे महिलादेखील आनंदित आहेत.

श्री गणेशाचे सोमवारी सर्वत्र जल्लोषात स्वागत झाले. या गणरायाच्या आगमनानंतर सर्वत्र गौरींच्या आगमनाची चाहूल लागली होती. घरोघरच्या महिला देखील गेल्या काही दिवसांपासून विविध कामात मग्न होत्या. आज या महिला सकाळपासूनच गौरींच्या स्वागतासाठी धडपडत असल्याचे दिसून आले. या गौरींचे पारंपरिक पद्धतीने आणि सोन पावलाने आगमन झाल्यानंतर महिलांच्या उत्साहाला उधाण आले होते. तसेच गौरीला सजविण्यासाठी या महिला परिश्रम घेत होत्या.

गौरीला सजविण्यासाठी लागणारे बाजूबंद, लक्ष्मीहार, सुवर्णजडीत कंबरपट्टे, बोरमाळ तसेच सोन्याचे विविध प्रकारचे हारही बाजारात उपलब्ध आहेत. गौरीसमोर आकर्षक देखावे सादर करण्यासाठी लाकडी व मातीच्या खेळण्यांची खरेदी करण्यावरही विशेष भर दिल्याचे दिसून आले. बाजारात मातीची चिमणी, हत्ती, उंदीर, पोपट, गाय, सिंह, वाघ, तुलसी, ससे, कासव आदी आकर्षक खेळणी खरेदीसाठी महिलांची झुंबड उडाली होती. तसेच गौरींसमोर ठेवण्यासाठी विविध फळे खरेदी करतानाही या महिला दिसून आल्या.

मूळ नक्षत्रावर विसर्जन
२५ ऑगस्टला अनुराधा नक्षत्र सुरू होत असल्याने याच दिवशी महालक्ष्मीची स्थापना करणे योग्य असेल , अशी माहिती आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ . अनिल वैद्य यांनी दिली आहे. धर्मशास्त्रानुसार साधारणतः नक्षत्र प्रधान असलेले हे व्रत गणेश चतुर्थीच्या तिसऱ्या दिवसापासून केले जाते . भाद्रपद शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावरच महालक्ष्मीचे आवाहन करावे, ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मी पूजन, महानैवेद्याचा कुळाचार आणि गौरीचे आवाहन करावे . बुधवारी २६ ऑगस्टला महालक्ष्मी - गौरी पूजन , महानैवेद्य आपापल्या कुळाचाराप्रमाणे करून गुरुवारी २७ ऑगस्टला दुपारी १२.३२ वाजेनंतर मूळ नक्षत्रावर आपापल्या परंपरेप्रमाणे विसर्जन करावे , असे वैद्य यांनी सांगितले आहे .

संपादन - स्वाती हुद्दार

loading image
go to top