Tiger
Tigersakal

Nagpur News : जंगलांलगतच्या गावांचे भय काही संपत नाही...

वन्यजीवांच्या हल्ल्यांनी ग्रामस्थांमध्ये दहशत; शेतपिकांचेही मोठे नुकसान

नागपूर - महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र असलेले चंद्रपूर, गडचिरोली हे दोन जिल्हे पूर्व विदर्भात आहेत. तसेच विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यांनाही वनक्षेत्राचे वरदान लाभले आहे. त्यामुळे वनक्षेत्रालगत असलेल्या गावांमधील मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

वन्यजीवांच्या हल्ल्यात ठार झालेल्यांचा आणि वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे वनालगतच्या गावांमधील शेतकरी आणि सामान्य माणसाच्या मनात सततच्या दहशतीचे साम्राज्य ठाण मांडून बसले आहे.

चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्यांमध्ये या संघर्षाची तीव्रता अधिक असली तरी अन्य जिल्ह्यांतील घटनांची आकडेवारीही दुर्लक्षित करण्याजोगी नाही. चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील नागरिक वाघ, बिबट्यांमुळे त्रस्त आहेत. विदर्भातील वाघांची वाढती संख्या, त्यांना हवा असलेला योग्य अधिवास, त्यांचे खाद्य यांच्या कमतरतेमुळे वाघांचा वावर शेतशिवार व मानवी वसाहतींकडे होत आहे.

आता वर्धा व यवतमाळ जिल्ह्यांतही वाघ-बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना होत आहे. सोबतच जंगलालगतचे शेतकरी रोही, नीलगाय, काळवीट, रानडुकरांच्या हैदोसाने दहशतीत आहे. विदर्भात अनेक ठिकाणी उसाचे पीक घेतले जाते. घनदाट जंगलाशेजारच्या अशा शेतांमध्ये रानडुकरांना सुरक्षित अधिवास मिळतो.

त्यामुळे अशा शेतशिवारात रानडुकरांचा हैदोस मोठ्या प्रमाणात दिसतो. जंगलालगतच्या अन्य शेतात हरिण, रोही यांचा त्रास अधिक आहे. बिबट्या आणि लांडग्यांनी गावात शिरून बकरी, शेळी व अन्य पाळीव प्राण्यांची शिकार केल्याच्या घटना घडल्या आहेत.

अलीकडच्या काळात गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात हत्तींच्या कळपाचा हैदोस वाढला आहे. वाघांच्या भ्रमणमार्गावर निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे वनक्षेत्राच्या बाहेरील औद्योगिक, मानवनिर्मित जंगले, झुडुपे व शेतशिवारात वाघाचा वावर वाढला आहे. सुरक्षित अधिवास शोधणे, सोपी शिकार यामुळे जंगलाबाहेर या वन्यप्राण्यांचे अस्तित्व दिसू लागले आहेत. त्याचाच परिणाम वन्यप्राणी व मानव यातील संघर्ष वाढीत दिसून येतो.

प्राण्यांचा हैदोस -

चंद्रपूर जिल्ह्यातील एक हजार १०० गावे ही वनालगत असून जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत वाघ, बिबट्याच्या हल्ल्यात ३४ जणांचे बळी गेले. गडचिरोली जिल्ह्यातील वडसा, कुरखेडा, कोरची, आरमोरी, गडचिरोली, आलापल्ली, धानोरा, चामोशी, मुलचेरा या तालुक्यांतील ५०० ते ६०० गावांमध्ये वन्यप्राण्यांचा उपद्रव आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील १८३ गावांनाही वन्यप्राण्यांचा त्रास आहे. टिपेश्वर अभयारण्यालगत असलेले टिपेश्वर व मारेगाव या दोन गावांचे वन्यजीव विभागाने पुनर्वसन केले आहे. पण, गावांच्या पुनर्वसनासाठी लागणारा कोट्यवधी रुपयांचा निधी मिळणे अशक्य असल्याने वनविभागाने आता श्यामाप्रसाद मुखर्जी सौरकुंपण योजना हाती घेतली आहे.

वर्धा जिल्ह्यात बोर अभयारण्य असून जिल्ह्याच्या सीमा चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यातील सीमावर्ती जंगलक्षेत्राला लागून आहे. जिल्ह्यात एप्रिल ते डिसेंबर २०२३ या नऊ महिन्यांच्या काळात वन्यप्राण्यांनी हल्ला करण्याच्या ९१ घटना घडल्या आहेत. यात पाच जणांचा मृत्यू, तर ८६ जण जखमी झाले आहेत.

भंडारा-गोंदिया जिल्ह्यात तीन अभयारण्ये व नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा काही भाग आहे. यातील संरक्षित जंगलाच्या बफर झोनमध्ये बरीच गावे आहेत. २०२३ या वर्षात भंडारा जिल्ह्यात १७६७ शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे वन्यप्राण्यांनी नुकसान केले आहे. २१९ पाळीव प्राण्यांची शिकार केली असून, ५३ व्यक्तींवर वन्यप्राण्यांनी हल्ले करून त्यांना जखमी केले आहे. अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील शेतशिवारामध्ये प्राण्यांनी हैदोस घातला आहे.

एप्रिल ते डिसेंबर २०२३ या नऊ महिन्यांच्या काळात वन्यप्राण्यांनी हल्ला करण्याच्या ४३ घटना घडल्या. यात मृतांच्या व जखमींच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाईपोटी ९.२५ लाखांची मदत देण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यात ज्ञानगंगा अभयारण्याला लागून असलेल्या खेडेगावांच्या शेतजमिनीवरील पिकांना रोही, रानडुक्कर, हरिण आदी वन्य प्राण्यांचा मोठा त्रास दरवर्षीच सहन करावा लागतो.

वाघांच्या संख्येत वाढ...

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, त्यालगतचे वनक्षेत्र आधीपासूनच वाघांसाठी पोषक राहिले आहे. याच भागात वाघाचे नैसर्गिक प्रजनन केंद्र असल्याने देशात वन्यजीव संरक्षण, व्याघ्र प्रकल्प यासाठी शासन, वनविभागस्तरावर केलेल्या प्रयत्नांमुळे वन्यजीवांना सुरक्षित अधिवास मिळाला.

परिणामी मागील काही वर्षांच्या काळात विदर्भातील जंगलांमधील वाघांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या संख्येने तीनशेचा आकडा पार केला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वाघांच्या संख्येनेही अर्धशतक गाठले आहे.

वाघांच्या भ्रमणमार्गात अडथळे

वाघ शेकडो किलोमीटरपर्यंत स्थलांतर करू शकतो. कधीकाळी देशभरात वाघांचे भ्रमणमार्ग (कॉरिडॉर) अस्तित्वात होते. हे भ्रमणमार्ग म्हणजे दोन घनदाट वनांना जोडणारे विरळ वनाचे प्रदेश असतात. पण अतिक्रमण, वाढलेले शेतीक्षेत्र, उद्योग आदींमुळे भ्रमणमार्ग नष्ट होत आहे.

विदर्भातील सर्वच व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांचे असे भ्रमणमार्ग आहेत. ताडोबा-अंधारी, पेंच, कऱ्हांडला, बोर, मेळघाट, टिपेश्वर अशा सात जिल्ह्यांतील अभयारण्यात या वाघांचा संचार तर आहेच, पण सोबतच थेट दक्षिणेकडे प्रवास करीत तेलंगणापर्यंत वाघांनी मजल मारली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com