

Maharashtra Drought Relief
esakal
नागपूर : यंदा पावसाअभावी पिके करपली. शासनाने राज्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर करून सवलती लागू केल्या खऱ्या; मात्र प्रत्यक्ष आर्थिक मदतीसाठी निकष गुलदस्त्यात असल्याने शेतकऱ्यांसह कृषी विभाग संभ्रमात आहे. पंचनाम्यांसाठी अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त न झाल्याने कृषी विभागाला आदेशाची प्रतीक्षा लागली आहे.
‘सरकारी काम अन् बारा महिने थांब’ ही म्हण प्रचलित आहे. यापूर्वीही दुष्काळी जिल्ह्यात मदतीसाठी महिनोमहिने वाट पहावी लागल्याचा अनुभव आहे. यंदा दुष्काळाची व्याप्ती वाढल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत शासनाने राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती जाहीर केली.
यात विदर्भातील १२० पैकी ९५ तालुक्यांचा समावेश आहे. दुष्काळस्थिती मान्य केली असली, तरी शेतकऱ्यांना हेक्टरी किती मदत कधी मिळणार, मदतीची मर्यादा दोन की तीन हेक्टर राहणार, याबाबत निकषच गुलदस्त्यात आहे. कृषी विभागालाही या संदर्भात कोणत्या सूचना शासनाकडून प्राप्त न झाल्याने ‘वेट ॲन्ड वॉच’ ची भूमिका घेतली आहे. पंचनामे झाल्यानंतर मदत जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी पंचनामे करण्यासंदर्भातही निर्देश आले नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
मदतीची हेक्टरी मर्यादा किती? शासनाने कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी आठ हजार ५०० रुपये, सिंचित शेतीसाठी १७ हजार रुपये, तर बहुवार्षिक फळपिकांसाठी २२ हजार ५०० रुपये मदत नैसर्गिक आपत्ती नुकसानासाठी निश्चित केली होती. ही मदत दोन हेक्टरच्या मर्यादेत होती. त्यानंतर मदतीची मर्यादा दोनवरून तीन हेक्टर केली. गतवर्षी नुकसानभरपाई तीन हेक्टरच्या मर्यादेत दिली होती. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामातील नुकसानभरपाईसाठी त्याच दरांचा आधार घेतला जाणार की नव्याने मदतीचे निकष निश्चित केले जाणार, याबाबत संभ्रम आहे.
"शासनाने दुष्काळ जाहीर केला. किती हेक्टरपर्यंत मदत असेल या संदर्भात शासन आदेश नसल्याने अद्याप पंचनाम्यांना सुरुवात केली नाही. शासन आदेश आल्यानंतर त्यानुसार कार्यवाही केली जाईल."
- उमेश घाटगे, विभागीय कृषी सहसंचालक नागपूर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.