esakal | एका लॅबमध्ये पॉझिटिव्ह, तर दुसरीत निगेटिव्ह; आता कोणता रिपोर्ट खरा?

बोलून बातमी शोधा

corona testing

एका लॅबमध्ये पॉझिटिव्ह, तर दुसरीत निगेटिव्ह; आता कोणता रिपोर्ट खरा?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : गुरुवारी आणि शुक्रवारी एक दिवसाआड एकाच व्यक्तीने शहरातील वेगवेगळ्या लॅबमध्ये केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्टही वेगवेगळा आला आहे. त्यामुळे खासगी लॅबमध्ये होणाऱ्या आरटीपीसीआर चाचण्यांचा अहवाल किती खरा, किती खोटा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार असून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचा: सीबीआय छापेमारीनंतर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया, म्हणाले...

महाल अयाचित मंदिर येथील रहिवासी सुशांत गायधने यांना प्रवास करायचा होता. त्यांना पाससाठी आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक होते. त्यानुसार गुरुवारी (२२ एप्रिल) सेंट्रल एव्हेन्यूवरील मॅग्नम लॅबमधून आरटीपीसीआर चाचणी केली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सर्दी, खोकला, ताप तसेच कुठलेच लक्षण नसताना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ते साशंक होते. नंतर दुसऱ्या दिवशी रामदासपेठेतील ध्रुव लॅबमधून त्यांनी पुन्हा आरटीपीसीआर चाचणी केली. त्यात अहवाल निगेटिव्ह आला. एकाच दिवसात आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल बदलल्याने नेमका कोणता रिपोर्ट खरा, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

पॉझिटिव्ह रुग्णाला क्वारंटाइन व्हावे लागते. मोठ्या प्रमाणात औषधांचा डोस घ्यावा लागतो. कुठलेच लक्षण नसताना औषधे घेतल्यास त्याचे दुष्परिणामही भोगावे लागतात. खासगी लॅब रुग्णांच्या जिवाशी खेळत आहे. अहवाल मॅनेज करणाऱ्या काही खासगी लॅबवर महापालिकेच्या वतीने कारवाईसुद्धा करण्यात आली होती. यानंतरही असे प्रकार सुरूच असल्याचे दिसून येते. शंका आल्याने आम्ही पडताळणी केली. मात्र, कुठल्या लॅबच्या अहवालावर विश्वास ठेवायचा हा प्रश्न आहे, असे सुशांत गायधने यांनी सांगितले.