अनेक नवे चेहरे लागले कामाला माजी नगरसेवकांचीही तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूर महापालिका निवडणुक

नागपूर : अनेक नवे चेहरे लागले कामाला; माजी नगरसेवकांचीही तयारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : फेब्रुवारीमध्ये अपेक्षित महापालिका निवडणुकीसाठी भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, सेनेतील इच्छुकांनी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. नव्या चेहऱ्यांसोबत माजी नगरसेवकांनीही नव्या तीन सदस्यीय प्रभागानुसार परिसराचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. सध्याच्या सत्ताधारी भाजप व कॉंग्रेसमधील उमेदवारीची खात्री नसलेल्या नगरसेवकांनीही त्यांच्या क्षेत्रातील आमदार व इतर नेत्यांचे उंबरठे झिजवण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे.

दिवाळी सणात शुभेच्छा देण्यासाठी दिग्गज नेत्यांकडे शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी दिसून येत आहे. यात मोठ्या प्रमाणात महापालिका निवडणुकीच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कॉंग्रेस, भाजपमध्ये तर ही गर्दी जास्तच दिसून येत आहे. भाजपमध्ये केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, शहर भाजपाध्यक्ष आमदार प्रवीण दटके तसेच पूर्व, मध्य, दक्षिण नागपुरातील आमदारांकडेही भाजपमधील इच्छुकांची गर्दी दिसून आली. अजूनही या नेत्यांकडे सकाळी गर्दी दिसून येत आहे.

हेही वाचा: बारामती सहकारी बँकेच्या निवडणूकीचे बिगुल वाजले

शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने हळुवारपणे नेत्यांजवळ अनेकांनी महापालिका निवडणुकीत उमेदवारीचेही बोलताना दिसत आहे. पुढील महापालिका निवडणुकीत उमेदवारीची खात्री नसलेल्या नगरसेवकांनी तर थेट केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तगादा लावला आहे. काही नगरसेवकांना उमेदवारी मिळणार नसल्याची चर्चा भाजपमध्ये आहे. त्यामुळे बहुतेक नगरसेवक पुन्हा उमेदवारीसाठी नेत्यांचे उंबरठे झिजवताना दिसत आहेत. हीच स्थिती कॉंग्रेसमध्ये असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शहर कॉंग्रेस अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्याकडेही अनेकजण शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले अन् उमेदवारीचीही मागणी केली.

या दोन्ही पक्षाचे माजी नगरसेवकही कामाला लागले आहेत. दक्षिण नागपुरातील भाजपमध्ये आलेल्या एका माजी नगरसेवकाने तर उमेदवार न मिळाल्यास अपक्ष लढण्याचीही तयारी केली आहे. मागील निवडणुकीतील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारांनी तर जनसंपर्कही सुरू केला. राष्ट्रवादी व शिवसेनेचे प्रबळ नेते शहरात नाही. त्यामुळे या पक्षातील इच्छुक नेमकी उमेदवारी कुणाकडे मागावी, याबाबत संभ्रमात आहेत. परंतु काही जण मुंबईतील नेत्यांशी असलेल्या संबंधांमुळे थेट त्यांच्या घरीही जाऊन आल्याचे समजते.

हेही वाचा: बारामती सहकारी बँकेच्या निवडणूकीचे बिगुल वाजले

सोशल मीडियावर वाढला वावर

सध्या काही नगरसेवकांचा सोशल मीडियावर वावर वाढला आहे. अनेक नगरसेवक प्रभागात फिरताना फेसबुकवर लाइव्ह दिसत आहेत. याशिवाय दक्षिण-पश्चिम नागपुरातील एक जनसेवक म्हणून काम करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्याने व्हॉट्‍स ग्रुप तयार करून त्यावर लोकांकडून तक्रारी मागवत असून त्या सोडविण्याचाही प्रयत्न करीत आहे. काही इच्छुक तर उमेदवारीसाठी त्यांच्याच पक्षातील नगरसेवक किती निष्क्रिय आहे हेही लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत.

loading image
go to top