esakal | रुग्णांच्या जीवाशी खेळ! रेमडेसिव्हिरच्या बाटलीत चक्क पाणी भरून विक्री; दोघांना घेतले ताब्यात

बोलून बातमी शोधा

Remdesivir
रुग्णांच्या जीवाशी खेळ! रेमडेसिव्हिरच्या बाटलीत चक्क पाणी भरून विक्री; दोघांना घेतले ताब्यात
sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : कोरोनावर उपयुक्त असलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनची तुटवडा लक्षात घेता मेडिकल क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. जरीपटका, वाठोडा या परीसरात टोळ्यांचे प्राबल्य आहे. कोरोना रूग्णांच्या नातेवाईकांना हेरून १२०० रूपयांचे रेमडेसिव्हिर इंजेक्शन तब्बल पाच हजार रूपयांना विकण्यात येत आहे.

हेही वाचा: धक्कादायक! कोरोना मृतदेहासोबत रुग्णांनी काढली अख्खी रात्र; नगर परिषद कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा

कृत्रिम तुटवडा आणि मागणी लक्षात घेता काही महाभागांनी रेमडेसिव्हिरच्या खाल्या बाटल्यांमध्ये चक्क पिण्याचे पाणी टाकून विक्री करण्याचा घाट रचला आहे. अशाच एका टोळीला सक्करदरा पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. अभिलाष देवराव पेटकर (२८, न्यू सुभेदार ले आऊट) आणि अनिकेत मोरेश्वर नंदेश्वर (२९. तुकडोजी पुतळा चौक) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत.

अभिलाष हा धंतोली येथील एका दवाखान्यात तर अनिकेत हा सुद्धा एका दवाखान्यात एक्स-रे टेक्नीशियन म्हणून कार्यरत आहेत. मिरची बाजार, भांडे प्लॉट परिसरात अनेक खासगी कोविड दवाखाने आहेत. या दवाखान्यात कोरोनाचे अनेक रूग्ण भरती आहेत. दवाखान्यात राहायला जागा नसल्याने रूग्णांचे नातेवाईक मिरची बाजार परिसरात फिरत असतात.

मंगळवारी दुपारी अभिलाष आणि अनिकेत हे भांडे प्लॉट चौकात गेले आणि त्यांनी रेमडेसिव्हिर विकण्याचा प्रयत्न केला. रेमडेसिव्हिर मिळत असल्याने रूग्णांच्या नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. एका जागरूक नागरिकाने त्या रेमडेसिव्हिर बाटलीची पाहणी केली असता त्यात पाण्यासारखे द्रव्य दिसून आले. वास्तविक पाहता रेमडेसिव्हिरच्या बाटलीत पावडर असते. त्याचप्रमाणे बाटलीवर कुठल्याही कंपनीचे लेबल नव्हते.

हेही वाचा: नागपूरकरांनो, लॉकडाउनच्या नियमावलीत मोठे बदल: वाचा काय राहणार सुरू आणि काय बंद

जागरूक नागरिकाला संशय आल्याने त्याने सक्करदरा पोलिसांना ही माहिती दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवान माने हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी गेले आणि दोघांनाही ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात आणून त्यांची विचारपूस केली असता धंतोली येथील दवाखान्यातून रिकाम्या बाटल्या मिळवून त्यामध्ये पाणी टाकून विक्री करीत असल्याची माहिती समोर आली. रात्री उशीरापर्यंत पोलिस दोघांचीही चौकशी करीत होते.

संपादन - अथर्व महांकाळ