ढगाळ वातावरणाचा तुरीला धोका, हवामान खात्याचा उद्यापासून पुन्हा इशारा

meteorological department has warned of unseasonal rains from tomorrow
meteorological department has warned of unseasonal rains from tomorrow

नांद (जि. नागपूर) : यंदा खरीप हंगामात सुरुवातीपासून शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अति पावसामुळे हातचे पीक गेल्यानंतर आता अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामही धोक्यात आला आहे. मागील आठवड्यात अवकाळी पावसाचा मार बसल्यानंतर हवामान विभागाने पुन्हा पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांना धडकी भरली आहे. 

पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे तुरीवर किडीचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता आहे. खरीप तर गेला आता रब्बीचे पीक धोक्यात आल्याने शेतकरी चिंतित आहेत. मागील आठवड्यात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी होऊन तापमान वाढले होते. रब्बी हंगामासाठी थंडी पोषक असून, ढगाळ वातावरण, पाऊस यामुळे पिकांवर किडीचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता आहे. 

यंदा मुबलक पावसामुळे तुरीचे विक्रमी पीक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु ढगाळ वातावरणामुळे तुरींच्या शेंगांवर किड येण्याची भीती आहे. यापूर्वी सोयाबीन, कपाशीच्या उत्पादनात फटका बसल्यानंतर शेतकऱ्यांनी तुरीवर आशा होती. पण आता वातावरण बदलल्याने तुरीचे काय होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून थंडी पुन्हा परतली आहे. परंतु या आठवड्याच्या शेवटी पुन्हा पावसाची शक्यता असल्याने तुरीवर रोग येण्याची शक्यता आहे. थंडी पडताच तुरीवर फुल्लोरा येऊ लागला आहे. ढगाळ वातावरणामुळे ही फुले गळतात. त्यामुळे उत्पादन कमी होते. याशिवाय ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या शेंगावर अळी तयार होण्याची शक्यता असते. दुष्काळात तेरावा महिना, असा संकटात शेतकरी सापडले आहेत. 

हरभरा, ज्वारी, लाखोळीही धोक्यात

यंदा खरीप हंगामात सोयाबीन, कपाशीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सोयाबीनचा तर खर्चही निघाला नाही. कपाशीत बोंडसड आणी बोंडअळीमुळे नुकसान झाले. त्यामुळे कपाशी उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट झाली. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील कापसाचा पहिलाच वेचा झाला असून दुसरा वेचा काहींनी केला, पण तो अर्ध्यापेक्षाही कमी निघत असल्याने शेतकरी हवालदिल आहेत. लागलेला कपाशीचा खर्चदेखील भरून निघण्याची आशा मावळली आहे. शेतकऱ्यांच्या तुरीवर आशा होती, पण ढगाळ वातावरणामुळे तुरीचेही नुकसान होण्याची भीती आहे. रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी, लाखोळी यांची पेरणी केलेली असून, ढगाळ वातावरणामुळे याही पिकांना धोका आहे.
 

शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. मात्र, अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहनपर रक्कम जमा झाली नाही. नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्वरित दोन लाखांच्या आतील कर्जमाफीसह पन्नास हजारांची प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.  केंद्र सरकारने कोटींचे पॅकेज शेतकऱ्यांसाठी जाहीर केले. दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाखांच्या वरील रक्कम भरल्यानंतर दोन लाखांपर्यंतची रक्कम माफ करण्याचा निर्णय घेतला होता. असे असले तरी आजही शेतकरी योजनेपासून वंचित आहेत.

संपादन : अतुल मांगे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com