esakal | नागपुरात ‘गब्बर’चा खून; दारू ढोसल्यानंतर करीत होता शिवीगाळ
sakal

बोलून बातमी शोधा

नागपुरात ‘गब्बर’चा खून; दारू ढोसल्यानंतर करीत होता शिवीगाळ

नागपुरात ‘गब्बर’चा खून; दारू ढोसल्यानंतर करीत होता शिवीगाळ

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : दारू ढोसल्यानंतर शिवीगाळ करीत असल्यामुळे दोन मित्रांनीच कुख्यात गुंड गब्बर उर्फ सचिन इरपाते (४०, रा. संजय गांधीनगर, हुडकेश्वर) याचा खून केला. हत्याकांडानंतर पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. ही घटना शनिवारी चक्कीखापा परिसरात उघडकीस आली. रवी नारायण पाराडे (५२, रा. विष्णू मातानगर) आणि सुभाष सखाराम भाकरे (५८, रा. महाकालीनगर) अशी आरोपींची नावे आहेत. तिघेही गुन्हेगार प्रवृत्तीचे असून एकमेकांचे मित्र आहेत. (Murder-In-Nagpur-Nagpur-Crime-news-Crime-News-nad86)

चक्कीखापा येथे सोहेल राणा यांची शेती आहे. या शेतात राणा यांनी मंगल कार्यालयाचे बांधकाम सुरू केले आहे. राणा यांनी तिघांनाही बांधकामाच्या कामावर ठेवले होते. तिघेही काम करून तेथेच स्वयंपाक करून बांधकामाच्या ठिकाणी राहत असत. शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास तिघांनीही भरपूर ढोसली. त्यानंतर गब्बर हा शिवीगाळ करायला लागला. त्यामुळ तिघांत वाद झाला. दारूच्या नशेत असलेले आरोपी संतप्त झाले. गब्बर खुर्चीवर बसला असता रवीने टिकास आणि सुभाषने फावड्याने गब्बरच्या डोक्यावर वार करून जागीच ठार केले.

हेही वाचा: भाजपसाठी धोक्याची घंटा? कोअर कमिटीची तातडीची बैठक

पुरावा केला नष्ट

गब्बरचा खून केल्यानंतर दोघांनीही मृतदेह पाण्याने धुतला. त्यामुळे रक्ताचे डाग नाहिसे झाले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह बांधकामावरील एका खड्डयात फेकून दिला. त्यानंतर जमिनीवर पडलेले रक्त पुसून काढले. त्याचप्रमाणे आरोपींच्या कपड्यावर रक्ताचे डाग उडाल्याने त्यांनी कपडे धुऊन पुरावा नष्ट केला. खड्ड्यात पडून गब्बरचा मृत्यू झाल्याचा देखावा दोघांनी केला.

हेही वाचा: लहान मुलांनी केला चोराचा पाठलाग; आईचे दागिने वाचविले!

असे आले हत्याकांड उघडकीस

शनिवारी सकाळी बांधकामावरील मुलगा घटनास्थळी आला. त्यावेळी गब्बर हा खड्डयात पडलेला दिसला. आरोपींनी ‘सचिन सो रहा है’ असे बोलून मुलाला गप्प केले. मात्र, मुलाला रक्ताचे डाग दिसल्याने त्याला संशय आला. त्याने शेतमालक राणा यांना सांगितले. राणा घटनास्थळी आले आणि त्यांनीच कोराडी पोलिसांना माहिती दिली. प्रभारी डीसीपी सारंग आव्हाड, कोराडीचे ठाणेदार कृष्णा शिंदे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली.

(Murder-In-Nagpur-Nagpur-Crime-news-Crime-News-nad86)

loading image