Murder of Friend : साहेबऽऽ मी माझ्या मित्राचा खून केला; त्याला दगडाने ठेचले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

murder

साहेबऽऽ मी माझ्या मित्राचा खून केला; त्याला दगडाने ठेचले

नागपूर : दारू पाजण्याच्या कारणावरून दोन मित्रांमध्ये वाद झाला. त्यामध्ये एकाने दुसऱ्याच्या कानशिलात लावली आणि शिवीगाळ केली. त्यामुळे संतप्त झालेल्या युवकाने मित्राच्या डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना बुधवारी दुपारी तीन वाजता सेंट झेवियर्स शाळेजवळील मैदानाजवळ घडली. दिनेश विनायक राजापुरे (३५, रा. दर्शन कॉलनी, तराळे चक्की, नंदनवन) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अतुल हेमराज शिवनकर (२३, रा. श्रीनगर, बालाजी अपार्टमेंट) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश राजापुरे आणि अतुल शिवनकर हे दोघेही मित्र होते. दोघेही सोबतच पेंटिंगच्या कामाचे ठेके घेत होते. दिनेशला दारूचे व्यसन आहे. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वीच त्याची पत्नी दोन मुलांसह सोडून माहेरी निघून गेली. पत्नी सोडून गेल्यानंतर दिनेश आई-वडिलांसह दर्शन कॉलनीत किरायाने राहायला लागला.

हेही वाचा: Latest News : शरद पवारांचा यवतमाळ, वर्धा जिल्हा दौरा रद्द

बुधवारी पेंटिंगच्या कामाचे १००० रुपये या दोघांना मिळाले. त्यांनी लगेच काही दारू आणि चकणा विकत घेतला. थेट सेंट झेविअर शाळेमागील मोकळ्या मैदानावर गेले. एका झाडाखाली बसले आणि दोघांनी दारू ढोसली. दिनेशने आणखी एक दारूची बाटली आणण्यासाठी अतुलला जाण्यास सांगितले. तर अतुलने नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या दिनेश त्याला शिवीगाळ केली आणि एक कानशिलात लगावली. चिडलेल्या अतुलने त्याला जबर मारहाण केली आणि शेवटी त्याच्या डोक्यात मोठा दगड घालून खून केला.

थेट पोहोचला ठाण्यात

‘साहेब... मी माझ्या मित्राचा खून केला. त्याला दगडाने ठेचून मारून टाकले’ असे सांगत युवक नंदनवन पोलिस ठाण्यात आला. तो दारू पिऊन असल्यामुळे पोलिसांचा विश्‍वासही बसत नव्हता. परंतु, नंदनवन पोलिसांनी गांभीर्य दाखवले आणि त्याला घटनास्थळावर नेले. तेथे दिनेशचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. या प्रकरणी पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला.

loading image
go to top