
नागपूर : प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र ठप्प
नागपूर : राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेतर्फे (मुंबई) नागरी सेवा परीक्षा २०२२ च्या पूर्व परीक्षा तयारीसाठी (प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटर) नागपूर केंद्रावर जानेवारी महिन्यात सामाईक प्रवेश प्रक्रिया परीक्षा घेण्यात आली. खुल्या वर्गापासून तर ओबीसी आणि अनुसूचित जाती, जमातीच्या १२० उमेदवारांची निवड होऊन चार महिने लोटले आहेत, मात्र ‘युपीएससी’ची परीक्षा तोंडावर आल्यानंतरही नागरी सेवा परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण वर्ग नागपुरातील मॉरिस कॉलेज येथे सुरू झाले नाहीत, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
कोरोना काळात लॉकडाउनमुळे प्रीआयएएस ट्रेनिंग सेंटर दोन वर्षांपासून बंद होते. परंतु प्रवेश प्रक्रिया राबवली होती. २०२२ मध्ये सामाईक प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. यूपीएससी-नागरी सेवा परीक्षा २०२२ च्या पूर्व तयारीसाठी परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया ९ जानेवारी २०२२ पासून सुरू झाली होती. २० जानेवारी २०२२ रोजी या प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात आली.नागपूर केंद्रावर १२० उमेदवारांना निवडण्यात आले. राज्यात नागपूरसह औरंगाबाद, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, नाशिक व अमरावती या ठिकाणी हे प्रशिक्षण केंद्र असून ४४० उमेदवारांना याचा लाभ मिळतो. याशिवाय बार्टीतर्फे ६० आणि अल्पसंख्याक विभागातर्फे ४० अशा एकूण १०० उमेदवारांना (विद्यार्थ्यांना) अनुदान दिले जाते. असे एकूण ५४० उमेदवार लाभार्थी ठरतात.
पदवी, पदवीच्या अंतिम वर्षाला प्रवेशित विद्यार्थ्यांना या प्रशिक्षण केंद्राची सामाईक परीक्षा देता येते. केंद्रात पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना ४ हजार रुपये मानधन दिले जाते. याशिवाय निवास, लायब्ररी, शिकवणी अशा सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. नागपूर केंद्रावरील १२० उमेदवारांची निवड झाली. मात्र नागरी सेवा परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण वर्ग अद्याप सुरू झाले नाही. यामुळे या उमेदवारांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. यासंदर्भात केंद्र संचालकांशी संपर्क साधला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.

बिहार, उत्तर प्रदेशाच्या तुलनेत महाराष्ट्रात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी आहे. प्रशिक्षण वर्गामध्ये अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थी अतिदुर्गम भागातून येतात. त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असते. तरीही ते शिक्षण घेतात. परंतु प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचे असे ढिसाळ नियोजन असते. नागपूर केंद्रात १२० विद्यार्थ्यांची निवड झाली. गरीब विद्यार्थी योग्य प्रशिक्षणाअभावी भारतीय प्रशासकीय सेवेपासून वंचित राहातात, हे एकप्रकारचे षडयंत्रच आहे.
-अतुल खोब्रागडे, खूप लढलो बेकीने, आता लढूया एकीने
Web Title: Nagpur Administrative Pre Service Training Center Closed
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..