

Nagpur Aerospace Project
esakal
नागपूर : मिहानमध्ये फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, ताल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीकडून बोईंग आणि एअरबससारख्या जागतिक विमान कंपन्यांसाठी प्रगत एअरोस्पेस सुटे भाग व फ्लोर बीम्सची निर्मिती सुरू असतानाच नागपूरच्या एअरोस्पेस क्षेत्राला आणखी मोठी झेप मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ब्राझीलची एरोस्पेस कंपनी एम्ब्रार आणि महिंद्रा समूह यांच्या संभाव्य सहकार्यातून ‘सी-३९० मिलेनियम’ या लष्करी परिवहन विमानाची फायनल असेंब्ली लाइन नागपुरात उभारण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. भारतीय वायुसेनेसाठी मध्यम परिवहन विमानांच्या खरेदीचा निर्णय झाल्यास या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मूर्त स्वरूप मिळू शकते. संरक्षण क्षेत्रातील सूत्रांच्या माहितीनुसार, वायुसेनेसाठी ६० ते ८० मध्यम परिवहन विमाने खरेदी करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
या प्रकल्पाचे संभाव्य मूल्य सुमारे एक लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र सरकारसोबत प्राथमिक स्तरावरील प्रक्रिया झाल्याची तसेच नागपुरात प्रकल्पासाठी जमीन निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, या प्रकल्पाचे भवितव्य केंद्र सरकारच्या ‘मीडियम ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट’ (एमटीए) कार्यक्रमातील अंतिम निर्णयावर अवलंबून आहे. ‘सी-३९० मिलेनियम’ची निवड आणि त्यानंतर अधिकृत करार झाल्यासच नागपुरातील प्रस्तावित असेंब्ली सुविधा प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा होईल.
फायनल असेंब्ली लाइनसोबतच सिस्टीम इंटिग्रेशन, उत्पादन अभियांत्रिकी आणि देखभाल-दुरुस्ती (एमआरओ) यांसारख्या उच्च तंत्रज्ञानाच्या सुविधा विकसित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिहान परिसरातील एअरोस्पेस परिसंस्था अधिक सक्षम होऊन नागपूरला देशातील महत्त्वाचे एअरोस्पेस उत्पादन व देखभाल केंद्र म्हणून विकसित होण्याची संधी मिळू शकते. या प्रकल्पामुळे स्थानिक एमएसएमई उद्योगांना विमान निर्मितीच्या जागतिक पुरवठा साखळीत सहभागी होण्याची संधी मिळेल. सुटे भाग, अभियांत्रिकी सेवा, लॉजिस्टिक्स, गुणवत्ता नियंत्रण आणि देखभाल क्षेत्रातील व्यवसायांना चालना मिळू शकते. त्यातून उच्च कौशल्याधारित थेट व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.
"महिंद्रा भारतात जागतिक स्तरावर स्पर्धात्मक एरोस्पेस परिसंस्था उभारण्यासाठी आणि देशाच्या आत्मनिर्भर भारताच्या महत्त्वाकांक्षेत योगदान देणाऱ्या महत्त्वपूर्ण उत्पादन व तंत्रज्ञान क्षमता निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे."
- विनोद सहाय, कार्यकारी सदस्य, महिंद्रा ग्रुप.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.