नागपूर : सासू-सासऱ्याचा खून

पत्नी,मुलीला केले जखमी; अमरनगरमधील मध्यरात्रीचा थरार
Crime news
Crime newssakal

हिंगणा : पत्नीसोबत झालेल्या किरकोळ वादातून जावयाने दगडाने व कुऱ्हाडीने वार करून सासू व सासऱ्याचा खून केला. पत्नी व सावत्र मुलीला जखमी केले. ही घटना शनिवारी मध्यरात्री १२च्या सुमारास निलडोह ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अमर नगरात घडली. रात्री घडलेल्या हत्याकांडाने परिसरातील नागरिक दहशतीत आहेत. पोलिसांनी एका तासातच नरमूला बेड्या ठोकल्या.

भगवान बाळकृष्ण रेव्हारे (६५), सासू पुष्पा भगवान रेव्हारे( ६२), असे मृतांची नावे आहेत, तर आरोपीची पत्नी कल्पना नरमू यादव (४०), तिची पहिल्या पतीची मुलगी मुस्कान मंडलीय (१३) या जखमी आहेत. जखमींना डिगडोह येथील लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर कल्पनाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक आहे. तर मुलीला सामान्य वॉर्डात ठेवण्यात आले आहे. तिला किरकोळ जखमा आहेत. यातील आरोपी नरमू सीता यादवने (४५) त्याच्या लहान मुलगा महेंद्र नरमू यादव (८)ह्याला मात्र कुठलीही इजा पोहोचवली नाही.

प्राप्त माहितीनुसार आरोपी नरमू यादव, पत्नी कल्पना, सावत्र मुलगी मुस्कान संतलाल मंडलीय, मुलगा महेंद्र नरमू यादव (वय ८) तसेच सासरे भगवान बाळकृष्ण रेव्हारे व सासू पुष्पा भगवान रेव्हारे असे मिळून राहतात. पहिल्या पतीने सोडल्यानंतर २०१३ मध्ये कल्पनाने नरमू यादव यांचेशी लग्न केले. तेव्हापासून आरोपी सासऱ्याकडे राहत आहे. आरोपी नरमू यादव हा वाहनचालक आहे. जेव्हा काम मिळेल तेव्हा कामावर जातो. त्याला दारुचे व्यसन आहे. दारू पिण्यासाठी पत्नीला मारहाण करून पैसे मागायचा. शनिवारी रात्री ९ च्या सुमारास आरोपी घरी आला. सर्वजण जेवण करून आपआपल्या खोलीत झोपी गेले.

घरातील खोलीमध्ये आरोपी, कल्पना व महेंद्र हे झोपलेले होते. अचानक मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास पतिपत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. आरोपीचा ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे दुसऱ्या खोलीत झोपलेले सासू-सासरे जागे झाले. खोलीत जाऊन बघितले असता आरोपी कल्पनाला लाथाबुक्यांनी मारहाण करून गळा दाबत होता. सासू पुष्पा भांडण सोडविण्यास गेली असता तिला लाथ मारून ढकलून दिले. नंतर भगवान समजविण्यास उठून आले. त्यांनाही काठीने मारले व परत घरी बाजूला ठेवलेली कुऱ्हाड भगवानच्या डोक्याचे बाजूला खांद्यावर मारली. नंतर त्याला ओढत घराबाहेर नेले व तेथे मोठ्या सिमेंटचा दगड डोक्यावर टाकला.

नंतर सासूलासुद्धा कुऱ्हाडीने व दगडाने मारहाण केली. दोन्ही म्हाताऱ्या दांपत्याला दगडाने मारल्याने ते घरासमोर रस्त्यात रक्तात खाली पडले होते. नंतर कल्पनालासुद्धा कुऱ्हाडीने खांद्यावर, डोक्यावर वार केले. तसेच मुस्कानला काठीने मारहाण केली. कुऱ्हाडीने उजव्या हाताच्या करंगळीवर मारून जखमी केले. हा थरार अगदी रस्त्यावर सुरू होता. दरम्यान शेजारच्यांनी पोलिसांनी माहिती दिली. एमआयडीसीचे ठाणेदार उमेश बेसरकर, साहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद गिरी आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

सर्व जखमींना लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. तिथे डॉक्टरांनी भगवान व त्याची पत्नी पुष्पा रेव्हारे यांना मृत घोषित केले. कल्पना व मुस्कानवर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच डीसीपी लोहित मतानी, डीसीपी (गुन्हे शाखा)राजमाने, सहा पोलिस आयुक्त प्रवीण तेजाळे ,पोलिस निरीक्षक कल्याणी हुमणे यांनी घटनास्थळी भेट दिली.

शेजाऱ्यांवरही केला हल्ला

हा थरार सुरू असताना घराजवळील काही लोक मदतीला आले. पण नरमू यादवच्या अंगात जणू शैतान संचारला होता. हातात कुऱ्हाड असल्याने कुणीही त्याच्या एकदम जवळ जाण्यास धजावत नव्हते. परंतु आरोपीने त्यांनाही कुऱ्हाड व दगडाचा धाक दाखवून धमकविल्याने ते लोक पळून गेले. या सर्व घटनेत आरोपीचा मुलगा हा तिथेच होता. त्याला मात्र काहीच केले नाही. चारही जखमी बेशुद्ध झाल्यावर आरोपीने रक्ताने माखलेले स्वतःचे कपडे बदलले व घटनास्थळावरून पळून गेला.

शेळ्यांच्या हक्कासाठी हत्याकांड

सासरे भगवान बाळकृष्ण रेव्हारे यांच्याकडे ४० ते ५० शेळ्या आहेत. त्या शेळ्या द्याव्यात म्हणून आरोपी नेहमी मागणी करायचा. मात्र, त्याला दारुचे व्यसन असल्याने सासऱ्याने त्याला शेळ्या दिल्या नाहीत. सासरे भगवान हे शेळ्या चारायला नेतात. घरातील वरच्या खोलीमध्ये शेळ्या ठेवण्यात येत होते. सध्या बाजारात शेळ्यांची किंमत चांगली असल्याने पैशाच्या हव्यासापोटी आरोपी सासऱ्याला त्रास देत होता. यातूनच हे हत्याकांड घडल्याचे दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com