Navneet Rana BJP: उमेदवारी राणांना, अग्नीपरीक्षा भाजपची! मित्रपक्षांची नाराजी दूर करण्यात होतेय दमछाक

अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली असली तरी या निवडणुकीत खरी अग्नीपरीक्षा भाजपचीच होणार आहे.
Amravati Loksabha
Amravati Loksabha Esakal

Amravati Loksabha Navneet Rana: अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली असली तरी या निवडणुकीत खरी अग्नीपरीक्षा भाजपचीच होणार आहे. भाजपमधील पदाधिकाऱ्यांचा विरोध मोडून काढणे पक्षश्रेष्ठींना सोपे असले तरी प्रहार, राष्ट्रवादी (अजित पवार गट) व शिवसेना या मित्रपक्षांची नाराजी दूर करताना चांगलीच दमछाक होणार आहे. विरोधाच्या या पार्श्वभूमीवर निवडणूक जिंकण्यासाठी भाजपची प्रतिष्ठा पणास लागणार आहे. नवनीत राणा यांनी गुरुवारी (ता.२८) भाजपमध्ये अधिकृतरीत्या प्रवेश घेतला आहे.

विद्यमान खासदार नवनीत राणा यांची उमेदवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आता प्रतिष्ठेची झाली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. मात्र, यातील एकही मतदारसंघ भाजपकडे नाही. विशेष म्हणजे, १९८० पासून आतापर्यंत भाजप प्रथमच कमळावर निवडणूक लढत आहे. यापूर्वी त्यांनी कमलताई गवई, प्रकाश भारसाकळे, अनंत गुढे, आनंदराव अडसूळ यांना समर्थन दिले आहे.

स्व. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फुटल्यानंतर दोन भागांत विभागलेल्या सेनेतील शिंदे गट व राष्ट्रवादीतील अजित पवार गट भाजपसोबत आहे. नवनीत राणा यांच्यामुळे युवा स्वाभिमान पक्षही त्यांच्यासोबत आला आहे. महायुतीची शक्ती वाढली असल्याचे वरवर दिसत असले तरी ते चित्र फारसे सकारात्मक मात्र नाही. शिंदे सेनेची अमरावती मतदारसंघात शक्ती नाही. माजी खासदार आनंदराव अडसूळ दुखावलेले आहेत.

अजित पवार गटाची शक्ती असली तरी त्यांचे पदाधिकारी राणांना मानणारे नाहीत. प्रहार जनशक्तीचे प्रमुख आमदार बच्चू कडू व राणा दाम्पत्याचे विळ्या-भोपळ्याचे सख्य आहे. त्यांची विरोधाची धार अद्यापही तीव्र आहे. तर अडसूळ पिता-पुत्रांनी उघडउघड विरोध केला आहे. भाजपमधील पदाधिकारी दुखावलेले असले तरी पक्षादेश सर्वोपरी मानत ते कामास लागतीलही, पण त्यामध्ये किती जोर राहील हे महत्त्वाचे ठरणार आहे.

Amravati Loksabha
Electoral Bond: 'इलेक्टोरल बाँड हा जगातील सर्वात मोठा घोटाळा', निर्मला सीतारामन यांच्या पतीचे वक्तव्य चर्चेत

पक्षांतर्गत विरोध, मित्रपक्षांची असहकार्याची भूमिका या पार्श्वभूमीवर भाजपला स्वबळावर अमरावती मतदारसंघात निवडणूक लढावी लागणार आहे. राणांना उमेदवारी देऊ नये, यासाठी कळीचा विरोध करूनही पक्षश्रेष्ठींनी विरोध मोडून काढत उमेदवारी दिल्याने दुखावलेल्या पदाधिकारी व मित्रपक्षांची नाराजी दूर करण्याचे आव्हान पक्षश्रेष्ठींसमोर आहे. या मतदारसंघात प्रथमच कमळावर निवडणूक लढणाऱ्या भाजपची अग्नीपरीक्षा होणार आहे.

Amravati Loksabha
Arvind Kejriwal: दिलासा नाहीच! अरविंद केजरीवाल यांची ईडी कोठडी १ एप्रिलपर्यंत वाढवली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com