
Nagpur : गद्दारांना धडा शिकवा; ओबीसी आरक्षणाच्या आश्वासानाचे काय ; अजित पवार
नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे टाळून ओबीसी व अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत ५० खोके एकदम ओके हे विसरू नका आणि गद्दारांना धडा शिकवा, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.
शनिवारी नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या दोन दिवसीय शिबिरात ते बोलत होते. महाराष्ट्रात ओबीसी आणि सर्व जाती जमातींसाठी काम करणारे महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आले आहे. त्यापूर्वी सत्तेवर आल्यास तीन महिन्यांच्या आत ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देऊ अशा वल्गना भाजपच्या नेत्यांनी केल्या होत्या.
आता वर्षभराचा कारभार झाला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जात नाहीत. पराभवाच्या भीतीने मुंबई असो वा नागपूर सर्वच महापालिकांच्या निवडणुका तांत्रिक कारणे पुढे करून सरकारने रोखून ठेवल्या आहेत. कर्नाटक, कसबा तसेच नागपूर विभागीय शिक्षक संघाच्या निवडणुकीच्या पराभवाची धास्ती भाजपने घेतली आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले ते सर्व पराभूत झाले आहेत.
राज्यातील शिंदे सेना-भाजप सरकारच्या विरोधात मोठा असंतोष खदखदत आहे. त्यांना जागा दाखवण्यासाठी पन्नास खोके...हे ओबीसींनी विसरू नये. मात्र यासाठी गप्प बसून चालणार नाही.
केंद्र व राज्य सरकारतर्फे ओबीसी समाजावर होत असलेला अन्याय जनतेपर्यंत पोहचवावा लागेल. मंडल आयोगाचा आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर त्या विरोधात ‘तुमचे मंडल तर आमचे कमंडल'' आंदोलन करणारे, ओबीसी समाजासोबत लबाडी करणारे कोण हे लक्षात ठेवून मतदान करण्याचे आवाहन यावेळी अजित पवार यांनी केले.
ओबीसींना वंचित ठेवण्याचा डाव
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील आरक्षणामुळे राज्यात अनेक नेते उदयास आले आहेत. यात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, आर.आर. पाटील, छगन भुजबळ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. लोकसंख्येने सर्वाधिक असलेल्या ओबीसींना आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा अधिकार कोणाला नाही. भाजपला आरक्षणच मोडून काढायचे आहे. अशा ढोंगी लोकांचा बुरखा फाडा, असेही अजित पवार म्हणाले.