...तर सहाही जणांचे जीव वाचले असते! प्रसंगावधान न राखल्यानेच अनर्थ घडला

ब्राह्मणमारी नदीचा पूल ओलांडत असताना अचानक स्कॉर्पिओच्या सायलेन्सरमध्ये पाणी शिरल्याने ऐन पुलाच्या मध्येच गाडी बंद पडली.
scorpio driver bablu divare family
scorpio driver bablu divare familysakal
Summary

ब्राह्मणमारी नदीचा पूल ओलांडत असताना अचानक स्कॉर्पिओच्या सायलेन्सरमध्ये पाणी शिरल्याने ऐन पुलाच्या मध्येच गाडी बंद पडली.

नागपूर - ब्राह्मणमारी नदीचा पूल ओलांडत असताना अचानक स्कॉर्पिओच्या सायलेन्सरमध्ये पाणी शिरल्याने ऐन पुलाच्या मध्येच गाडी बंद पडली. त्यावेळी प्रसंगावधान राखून ड्रायव्हरसह सर्व जण गाडी तिथेच टाकून पटकन पाण्यातून दहा-पाच पावलं पुढे गेले असते तर, कदाचित सहाही जणांचा जीव वाचू शकला असता. गोंधळलेल्या अवस्थेत कुणालाच काही न समजल्याने सर्व जण गाडीतच बसून राहिले. नंतर पाण्याचा लोंढा येऊन स्कॉर्पिओसह सर्व जण वाहून गेले.

‘सकाळ’ने नांदागोमुखजवळ मंगळवारी दुपारी घडलेल्या या दुर्दैवी घटनेबद्दल स्कॉर्पिओचालक लीलाधर ऊर्फ बबलू डिवरेची पत्नी प्रणिताकडून जाणून घेतले असता तिने हा खुलासा केला. "तुमच्या पतीने एवढ्या पाण्यातून गाडी काढायला नको होती", असा प्रश्न केला असता प्रणिता म्हणाली, तसं नाही जी, पुलावरून गाडी सहज निघू शकली असती. अर्ध्यापेक्षा अधिक अंतर पार केल्यानंतर सायलेन्सरमध्ये पाणी घुसून गाडी तिथेच बंद पडल्याचे मला काही लोकांनी सांगितले. गाडी बंद पडली नसती तर सर्वच जण सुखरूपपणे पुल पार करू शकले असते. संभाव्य धोका लक्षात घेता, त्यावेळी जर सर्वांनी पटापट खाली वरून एकमेकांच्या मदतीने उरलेले अंतर दोर धरून पार केले असते, तरीही प्राण वाचू शकले असते.

मात्र त्यांनी असे न करता तिथेच वेळ घालविला. त्याचवेळी समोरून एका ट्रकवाल्यानेही दोर टाकून बंद पडलेल्या स्कॉर्पिओला ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात दोर तुटला आणि तेवढ्यात पाण्याचा लोंढा येऊन स्कॉर्पिओसह सहाही जणांना जलसमाधी मिळाली. या संकटाच्या क्षणी धास्तावलेल्या रोशनी चौकीकरने स्कॉर्पिओमधूनच आपल्या पतीशी (नरेंद्र चौकीकर) मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र फोन लागण्यापूर्वीच गाडी ब्राह्मणमारीच्या पात्रात बुडाली. या दुर्घटनेत ३८ वर्षीय बबलूसह सहा जण वाहून गेले. यातील कालपर्यंत पाच मृतदेह सापडले होते. बबलूचा मृतदेह तीन दिवसांनंतर आज शुक्रवारी मिळाला.

प्रणिताच्या शेवटच्या आशेवरही पाणी

घटनेला तीन दिवस लोटूनही कालपर्यंत बबलूचा मृतदेह सापडला नव्हता. त्यामुळे ईश्वरी चमत्कार होऊन पती जीवंत असल्याची आनंदाची बातमी मिळावी, या भाबड्या आशेने प्रणिता, तिन्ही मुले व म्हातारी आई वारंवार घराबाहेर येऊन रस्त्याकडे टक लावून पाहात होते. मात्र सरतेशेवटी आज चौथ्या दिवशी बबलूचा मृतदेह सापडल्याने प्रणिताच्या उरल्यासुरल्या आशेवरही पाणी फिरले. पतीच्या प्रतीक्षेत प्रणिता गेल्या तीन दिवसांपासून जेवली व झोपलीसुद्धा नसल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. रडून रडून प्रणिताचे डोळे सुजले व लाल झाले आहे.

पैसे नव्हे, जीव लाखमोलाचा

या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकी चार लाखांची आर्थिक मदत जाहीर केल्याबद्दल विचारले असता प्रणिता म्हणाली, चार लाखांचे मी काय करू? माझा पतीच जीवंत नसेल तर पैसे कोण्या कामाचे ? मला पैसे नको. पती सुखरूप घरी यावे, अशी मी देवाला सतत हाक मारत आहे. उल्लेखनीय म्हणजे, बबलूचा परिवार सध्या प्रचंड आर्थिक अडचणीतून जात आहेत. शाळेचे गणवेश व पुस्तके खरेदी करण्याची सोय नसल्यामुळे बबलूचे तिन्ही मुले सध्या घरीच बसून आहेत. गोधनी येथे राहणाऱ्या डिवरे परिवारात बबलू एकटाच कमावता होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com