
Nagpur : तिशीतील तरुणींना ब्रेस्ट कॅन्सरची जोखीम
नागपूर : जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार १० महिलांमध्ये एक तर आपल्या देशात २२ महिलांमध्ये एक महिला ब्रेस्ट कॅन्सरच्या विळख्यात सापडत असल्याची माहिती कॅन्सररोग जागृती तज्ज्ञ डॉ. रवि देशमुख यांनी दिली.
घरासाठी महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. तर दुसरीकडे महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणी धुम्रपानासह ड्रग्सच्या आहारी गेल्याने तिशीत कॅन्सरच्या विळख्यात अडकत आहेत. यामुळे यांच्या मनात आरोग्य जागृतीची जाणीव उत्पन्न करणे महत्त्वाचे आहे. कॅन्सर झाला हे कळल्यानंतर महिला खचून जातात. त्यानंतर नकारात्मक विचार सुरू करतात. आनुवंशिकतेने ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण एकूण ब्रेस्ट कॅन्सरच्या तुलनेत अलीकडे वाढत आहे. एकूण कॅन्सरग्रस्त महिलांमध्ये २८ टक्के ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण आहे. महिलांच्या ब्रेस्टमध्ये असलेली प्रत्येक गाठ कॅन्सरची नसते. हे महिलांना समजाऊन सांगायला हवे. परंतु ही गाठ नेमकी कशाची आहे, याचे निदान योग्य वेळेत झाले नाही, तर कॅन्सरमध्ये ही गाठ बदलू शकते, असे डॉ. देशमुख म्हणाले.
कारणीभूत घटक
व्यायामाचा अभाव
बैठी जीवनशैली
चुकीची जीवनशैली
अयोग्य आहार
तंबाखू, दारूचे सेवन
हारमोनयुक्त औषधं
ब्रेस्टवर केलेली शस्त्रक्रिया
उशिरा लग्न
उशिरा मुल होण्याचा पायंडा
दैनंदिन ताण-तणाव
ब्रेस्ट कॅन्सरचा प्रभाव अलीकडे पंचेविशीतील तरुणींमध्येही दिसू लागला आहे. ही गंभीर बाब आहे. याला कारणीभूत महाविद्यालयीन उंबरठ्यावरील अनेक मुली तंबाखू, सिगारेट, बिअर,दारूसह ड्र्ग्सच्या च्या आहारी गेल्या असल्याचे चित्र समाजात आहे. चाळिशीनंतरच मॅमोग्राफी करावी. ब्रॉचा वापर कमी करावा. स्वतः महिलांना स्वतःचे ब्रेस्ट तपासावे. हार्मोन्स युक्त गोळ्यांचा वापर टाळावा.
-डॉ. रवि देशमुख,नागपूर