
Nagpur Bus Bomb Rumor: गणेशपेठ बसस्थानकाच्या आगारात चार दिवसांपासून उभ्या असलेल्या एका बसमध्ये ‘टिफिन बॉम्ब’ आढळल्याची सूचना मिळाल्याने आज दिवसभर चांगलीच खळबळ उडाली. विशेष म्हणजे ही बस गडचिरोली आगाराची असल्याने गांभीर्य आणखीच वाढले होते. दरम्यान सुराबर्डी येथील अपारंपरिक ऑपरेशनल ट्रेनिंग सेंटर आणि स्पेशल ॲक्शन ग्रुपद्वारे करण्यात आलेल्या तपासणीमध्ये मात्र ते अग्निशमन यंत्र असल्याचा शेवटी खुलासा झाला आणि सर्वानी सुटकेचा निःश्वास सोडला.
बसचालकाच्या सीटच्या बाजूला बुधवारी सकाळी एक वाजताच्या सुमारास टिफिनमध्ये स्फोटके सापडल्याची सूचना मिळाली. ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली. ही स्फोटके बॉम्बशोध व नाशक पथकाकडून सुराबर्डी येथील अपारंपरिक ऑपरेशनल ट्रेनिंग सेंटर आणि स्पेशल ॲक्शन ग्रुपमध्ये (यूओटीसी) निकामी करण्यासाठी पाठविण्यात आली. दरम्यान ती स्फोटकेच असल्याचीच माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली होती. पण रात्री उशिरा केलेल्या तपासणीत ते अग्निशमन यंत्र असल्याचा खुलासा झाला. त्यामुळे सगळ्यांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, हा खोडसाळपणा केला कुणी याचा पोलिस शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ फेब्रुवारीला एमएच ४० वाय ५०९७ या क्रमांकाची बस गडचिरोली येथील अहेरी बस आगारातून रात्रीच्या सुमारास गणेशपेठ स्थानकातील आगारात आली. रात्रभर डेपोत बस उभी करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी ती दुरुस्ती करावयाची असल्याने ती आगारातच ठेवण्यात आली. बससाठी काही सुटे भाग ४ फेब्रुवारीला आले. त्यामुळे दुरुस्तीचे काम सहा फेब्रुवारीपर्यंत चालले. त्यानंतर गणेशपेठ आगाराकडून गडचिरोली आगाराला गाडी पूर्णपणे दुरुस्त झाल्याचे कळविण्यात आले. गडचिरोलीचे चालक गाडी नेण्यासाठी न आल्याने ही बस मंगळवारी सावनेरला पाठविण्यात आली होती.
नागपूर आगारात आलेली बस गडचिरोली वरून आल्याने तर्कवितर्काला उधाण आले होते. या प्रकाराने पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून नक्षलवाद्यांकडून हा बॉम्ब तर ठेवण्यात आला नाही ना? असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला. दरम्यान टिफिनच्या आकार असलेल्या स्फोटकामध्ये डिटोनेटर आणि टायमर नसल्याने कुठलाही धोका नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले असले तरी त्यात विस्फोटक असल्याची माहिती दिली आहे.
आता पोलिसांकडून बस बुटीबोरी रिधोरा येथून आल्याने आणि त्यानंतरच ही वस्तू दिसल्याने तिथेच हा बॉम्ब ठेवण्यात तर आला असावा असाही संशय व्यक्त केला होता. पोलिसांकडून तपास सुरू झाला असून दहशतवाद विरोधी पथकाकडूनही त्याची चाचपणी करण्यात आली.
दिवसभर बसमध्ये सापडलेले स्फोटक असल्याची चर्चा संपूर्ण नागपुरात सुरू होती. सर्व पथके या तपासात गुंतली आणि कुठून ही स्फोटके आलीत, याचा शोध घेत होती. मात्र, रात्री साडेनऊ दहा वाजताच्या सुमारास टिफिनच्या आकारात पॅक केलेले आणि वरून वातीसारखे काही लावलेले ते अग्निशमन यंत्र निघाले. त्यामुळे ‘खोदा पहाड निकला चुहा’ अशीच चर्चा परिसरात होती.
चार दिवसांपासून बसची दुरुस्ती सुरू होती. त्यावेळी ड्रायव्हरच्या सीटच्या बाजूला असलेली संशयास्पद वस्तू यांत्रिकी विभागाच्या निदर्शनास आली नाही. या बसने सावनेर आणि बुटीबोरी असाही प्रवास केला. त्यावेळीसुद्धा चालकाला व प्रवाशांना काहीच आढळले नाही. नागपूर आगारात परत आल्यावरच बसमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याचे समजले. त्यानंतर हालचालीला वेग आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.