esakal | नागपूर : मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेला भोपळा
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेला भोपळा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने जागा सोडल्या नाही म्हणून स्वबळावर लढलेल्या शिवसेनेला भोपळाही फोडता आला नाही. एकूण १० उमेदवार शिवसेनेने उभे केले होते. त्यांपैकी दोन उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली हीच सेनेसाठी मोठी उपलब्ध ठरली.

रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे कृपाल तुमाने खासदार आहेत. रामटेक विधानसभेत सेनेचे आशिष जयस्वाल आमदार आहेत. अलीकडेच शिवसेनेने जिल्हा प्रमुख सतीश इटकेलवार यांना नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त केले आहे. यानंतरही शिवसेनेला आपला दम दाखवता आला नाही. शिवसेना उमेदवाराच्या प्रचारसभेत आमदार आशिष जयस्वाल यांनी वादग्रस्त भाषण केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुळे मेलेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी जिवंत झाली. त्यांना कुंत्रही विचार नव्हते, असे खळबळजनक वक्तव्य जयस्वाल यांनी केले होते. जयस्वाल यांच्या रामटेक विधानसभा मतदारसंघात दोन उमेदवार उभे होते. बोथिया पालोरा मतदारसंघात गोंडवाना गणतंत्र पार्टीचे हरीश उइके विजयी झाले. त्यांनी माजी सदस्य काँग्रेसचे कैलाश राऊत यांना पराभूत केले. शिवसेनेचे देवानंद वंजारी तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले. एकेकाळी रामटेक विधानसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या तसेच शिवसेनेचा दबदबा असलेल्या मौदा-अरोली सर्कलमध्येही सेनेचे प्रशांत भुरे पराभूत झाले. काँग्रेसचे योगेश देशमुख येथून निवडून आले आहेत. मात्र येथे शिवसेनेच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.

हेही वाचा: अभियांत्रिकी प्रवेशानंतर पदवीच्या जागा राहणार रिक्त

शिवसेनेचे दुसरे जिल्हा प्रमुख राजू हरडे यांनाही काँग्रेस-राष्ट्रवादी विचारत नसल्याने निवडणूक लढण्याचा इरादा दर्शवला होता. मात्र ते प्रत्यक्षात निवडणूक लढले नाही. त्यांच्या क्षेत्रात सावरगाव सर्कल ललिता खोडे, भीष्णूर सर्कलमध्ये संजय ढोमणे, पारडसिंगा सर्कलमधील माधुरी सुने, येणवा मतदारसंघातील अखिल चोरघडे या सेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला. यांपैकी अखिल चोरघडे यांना २८८ मते तर सुना यांना अवघी ३०० मते पडली. खोडे यांनी अकारशे मते घेतली असली तरी त्या चवथ्या क्रमांकावर आहेत. नीलडोहचे सेनेचे उमेदवार नंदू कन्हेरे १४४० मते, डिगडोहच्या उमेदवार निर्मला चौधरी २७४, इसासनीमध्ये संगीता कौरती यांना पाचव्या क्रमांकाची मते मिळाली.

आमदार मेघेंना धोक्याचा इशारा; चारपैकी तीन जागांवर भाजप पराभूत

जिल्हा परिषदेची पोटनिवडणुकीच्या निकालाने हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीर मेघे यांनाही जबर धक्का बसला आहे. त्यांच्या मतदारसंघातील चारपैकी भाजपचे तीन उमेदवार पराभूत झाले आहेत. विशेष म्हणजे पक्षाने त्यांनाच निवडणूक प्रमुख केले होते.

मेघे सुमारे सात वर्षांपासून हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. ते दोनदा येथून निवडून आले आहेत. मागील निवडणुकीत महाविकास आघाडीने माजी आमदार विजय घोडमारे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्याचाही काही फायदा राष्ट्रवादीला झाला नाही. विशेष म्हणजे घोडमारे येथे यापूर्वी याच मतदारसंघाचे आमदार होते. त्यांच्याऐवजी मेघे यांना पक्षाने उमेदवारी दिली होती. त्यानंतर घोडमारे यांनी हाताला घड्याळ बांधले. हिंगण्यातील दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री रमेश बंग त्यांच्यासोबत होते. मतदारांसोबत असलेला दांडगा जनसंपर्क आणि भाजपच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांमुळे मेघे चांगलेच लोकप्रिय आमदार म्हणून ओळखले जातात. त्यांनी या मतदारसंघात आपली पकड घट्ट केल्याचे बोलले जात होते. मात्र जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या निकालाने त्यांनाही धोक्याचा इशारा दिला आहे. हिंगणा-निलडोह जिल्हा परिषदेच्या सर्कलमध्ये राजेंद्र हरडे सदस्य होते. मात्र, त्यांना आपला मतदारसंघ पोटनिवडणुकीत राखता आला नाही. काँग्रेसच्या संजय जगताप यांनी त्यांना पराभूत केले. डिगडोह मतदारसंघात पक्षांतर करणे माजी सदस्य सुचिता ठाकरे यांना चांगलेच महागात पडले. ठाकरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केला. त्यामुळे नाराज झालेल्या भाजपच्या रश्मी कोटगुले यांनी राष्ट्रवादीत दाखल झाल्या. या निवडणुकीत कोटगुले निवडून आल्या आहेत. त्यामुळे उमेदवारापेक्षा येथे राष्ट्रवादीची ताकद जास्त असल्याचे दिसून येते. गोधनीमध्ये काँग्रेसच्या कुंदा राऊत यांनी आपले वर्चस्व राखले. ही जागा काँग्रेसचीच होती. त्यांनी भाजपच्या विजय राऊत यांना पराभूत केले. इसासनी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार अर्चना गिरी यांनी मेघे यांची इभ्रत राखली. त्यांनी राष्ट्रवादीच्या गीता हरिणखेडे यांना धूळ चारली.

loading image
go to top