Nagpur : बालनाट्य चळवळ जोपासणारी ‘कार्यकर्ती’ राधिका

अभिनेत्री, लेखिका अन्‌ दिग्दर्शनातही नावलौकिक
लेखिका राधिका देशपांडे
लेखिका राधिका देशपांडेsakal

नागपूर : प्रेक्षकांच्या मनोरंजनासह कलावंताला समृद्ध करणारी कला म्हणून नाट्यकलेकडे बघितले जाते. अगदी लहानवयापासून बालनाट्याच्या माध्यमातून रंगमंचावर एंट्री घेणारे अनेक कलावंत या क्षेत्रात आहेत. मात्र, नाटक आणि त्यातल्या त्यात बालनाट्य ही चळवळ म्हणून जोपासणारे अगदी बोटावर मोजण्याएवढेच. अभिनेत्री, दिग्दर्शिका, लेखिका राधिका देशपांडे ही त्यातीलच एक कार्यकर्ती.

भावी पिढी जागरूक नागरिकाच्या रूपात उदयास यावी आणि देशाचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी नाट्यकलेचा समाज प्रबोधनाचे माध्यम म्हणून उपयोग करीत ही कलावंत ‘कार्यकर्ती’ म्हणून समाजात वावरते. मालिकेच्या माध्यमातून आपण राधिकाला एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखतो. मात्र लेखिका, बालनाट्य दिग्दर्शक, राधिका क्रिएशन्सची निर्माती आणि निवेदिका, अशा अनेक पातळीवर ती झोकून देऊन काम करीत आहे.

राधिकाचे वडील, ज्येष्ठ नाट्यकर्मी संजय पेंडसे या क्षेत्रातील एक नावाजलेले नाव. वडिलांचे काम पाहत त्यातून केलेल्या ज्ञानार्जनातून ती आज यशस्वी कलावंत अन्‌ बालनाट्य दिग्दर्शिका म्हणून ओळखली जाते. साडेचार वर्षांची असताना मांजरीचे पात्र राधिकाने साकारले होते अन्‌ त्यासाठी पारितोषिकही पटकाविले. यादरम्यान झालेले कौतुक, चेहऱ्याला लागलेला रंग (मेकअप) ती विसरली नाही.

आठवीत असताना ‘दुर्गा झाली गौरी’ महानाट्यात पहिल्यांदा ती मुख्य पात्रात दिसली. चौदाव्या वर्षी वडिलांनी आकाशवाणीवरील एका कार्यक्रमासाठी बालनाट्याचे दिग्दर्शन करण्याची संधी दिली. तिने दिग्दर्शित केलेले हे पहिले बालनाट्य तिची स्वलिखित पहिली संहितादेखील ठरले, हे विशेष.

बालनाट्य चळवळ जोपासणारी ‘कार्यकर्ती’ राधिका

अनेक वर्षे हौशी कलावंत म्हणून काम करीत तिने अभियांत्रिकीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. लग्नानंतर बंगळूरू येथे नोकरी करीत असताना महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून नाटकांमध्ये भाग घेतला.

अभिनेत्री म्हणून तिच्यातील गुणांचे कौतुक करीत यजमानांनी तिला कला क्षेत्रात वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहन दिले. ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेत काम करण्याची संधी तिला मिळाली अन्‌ तिने त्याचे सोने करीत घराघरांत स्वतःची ओळख निर्माण केली.

‘आई कुठे काय करते’ या अन्‌ अशा अनेक मालिका, चित्रपटांमध्ये झळकूनही बालनाट्य चळवळीलाच भक्कम आधार द्यायचा, असा निश्‍चय राधिकाने आठ वर्षांपूर्वी केला. एक हजारावर बाल कलावंतांना राधिकाने बालनाट्याचे धडे दिले आहेत. लेखिका म्हणूनही ती प्रसिद्ध असून, आजवर तिची नऊ पुस्तके प्रकाशित आहेत.

राधिकाची कारकीर्द

  • मालिका : होणार सून मी ह्या घरची, ती फुलराणी, स्वराज्य रक्षक संभाजी, आई कुठे काय करते

  • चित्रपट : व्हॅनिला स्ट्रॉबेरी ॲन्ड चॉकलेट, अजिंक्य, आम्ही बोलतो मराठी, आरती, बर्नी

  • बालनाट्य दिग्दर्शन : सियावर रामचंद्र की जय

  • बालनाट्य लेखन : नाटिका एन बारा, बोलो ता रा रा रा, सियावर रामचंद्र की जय, त्रिकूट बालनाट्याचे, मुंगळे चार आणि बालनाट्ये तीन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com