esakal | Nagpur : काँग्रेस आता काय करणार?
sakal

बोलून बातमी शोधा

nana patole nitin raut

Nagpur : काँग्रेस आता काय करणार?

sakal_logo
By
राजेश चरपे -सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचा ठराव आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून महापालिका निवडणुकीत तीन सदस्यीय प्रभाग पद्धती कायम ठेवली. यामुळे काँग्रेस आता काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे भाजपला फायदा झाल्याचे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. नागपूरमध्ये भाजपचे विक्रमी १०८ नगरसेवक निवडून आले होते. चार सदस्यीय प्रभागाचा फटका आमदार व काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनासुद्धा बसला होता. ते या निवडणुकीत पराभूत झाले होते. १५१ पैकी काँग्रेसचे फक्त २९ नगरसेवक निवडून आले. काँग्रेसच्या पराभवाला वेगवेगळी कारणे असली तरी चार सदस्यीय प्रभाग पद्धत हेसुद्धा त्यांपैकी ऐक महत्त्वाचे कारण होते.

मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीचे सूतोवाच केले होते. त्याला माजी प्रदेशाध्यक्ष व विधानसभेतील काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विरोध दर्शवला. या निर्णयावर एकमत होत नसल्याने मुख्यमंत्र्यांना अधिकार दिले होते. मात्र, त्यांनी थेट जाहीर घोषणा सर्वांना अडचणीत टाकले. त्यामुळे अंतिम निर्णय घेताना फेरविचार केला जाईल अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु, मुख्यमंत्री चर्चेच्या भानगडीत पडलेच नाही. सरळ तीनच्या प्रभागाचा अध्यादेश काढून मोकळे झाले.

जनतेत जाऊन विरोध ?

आमच्या विरोधाची दखल घेतली जात नसेल तर आता याविषयावर मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार नाही असा इशारा नाना पटोले यांनी दिला होता. सरकार आणि संघटना यांचे मत वेगवेगळे असू शकते. आम्ही संघटनेच्या माध्यमातून या निर्णयाचा जनतेत जाऊन विरोध करू, असे पटोले म्हणाले होते. ते आता काय करतात याकडे काँग्रेसचे लक्ष लागले आहे. राज्याचे ऊर्जामंत्री तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांचाही तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीस विरोध केला होता. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला कडाडून विरोध केला जाईल. तोंडी नव्हे तर कायद्याचे पेपर घेऊन बैठकीत युक्तिवाद केला जाईल, असा दावा राऊत यांनी केला होता.

loading image
go to top