
Nagpur : मला दुसऱ्या गुन्ह्यात अडकवून बाहेर काढा
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन करीत, पुन्हा १० कोटीची खंडणी मागणाऱ्या जयेश पुजारी ऊर्फ जयेश कांथा ऊर्फ साकीर ऊर्फ साहिर याने पोलिसांना मला दुसऱ्या गुन्ह्यात अडकवून बाहेर काढण्याची मागणी केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यातूनच तो असा प्रकार करीत असल्याची शंका आता व्यक्त होत आहे.
जयेशने जानेवारी महिन्यात गडकरी यांच्या कार्यालयात फोन करीत त्यांना जीवे मारण्याची धमकी देत, खंडणीची मागणी केली होती. त्यावेळी गुन्हे शाखेसह धंतोली पोलिसांचे पथक त्याच्या चौकशीसाठी बेळगाव येथील कारागृहात गेले होते. पोलिसांनी त्याची भेट घेत चौकशीही केली होती. त्यावेळी त्याच्याकडून अनेक व्हीआयपींची नावे असलेली डायरी आणि काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली होती.
दरम्यान सातत्याने चौकशीदरम्यान मला येथे राहायचे नसून मला दुसऱ्या कोणत्याही गुन्ह्यात अडकवून येथून बाहेर काढा अशी मागणी तो करीत होता. मंगळवारी पुन्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात बेळगाव येथील कारागृहातून फोन आला. यावेळी त्याने गडकरी यांचा घातपात करेल अशी धमकी देत, मी ‘डी’ गॅंग (दाऊद) टोळीचा सदस्य असल्याची बतावणी केली.