Nagpur: एक डिसेंबरपासून शाळांमध्ये किलबिलाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

school students.jpg

एक डिसेंबरपासून शाळांमध्ये किलबिलाट

नागपूर : गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या ग्रामीण व शहरी भागातील पहिलीपासून शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. यानुसार पहिली ते चौथीच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. यामुळे शाळांत पुन्हा विद्यार्थ्यांची हजेरी पटावर लागणार असून शाळांचा परिसर गजबजणार आहे. त्यामुळे पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शाळा सुरू करण्याबाबत लवकरच नियमावली जाहीर केली जाणार आहे.

पहिली ते चौथी या वर्गातील मुले लहान असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेची काळजी प्रामुख्याने शाळांवर असणार आहे. शाळेतले शिक्षक, मुख्याध्यापक आणि शालेय प्रशासनाला यासंदर्भातले योग्य ते आदेश देण्यात येणार असल्याचे राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले. सरकारच्या या निर्णयाचे शहरासह ग्रामीण भागातील शिक्षकांकडून स्वागत करण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या अतिशय कमी असल्याने विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान पाहता शाळा सुरू कराव्यात अशी मागणी शिक्षक व शिक्षक संघटनांकडून केली जात होती. दरम्यान शाळांमधील अपवादात्मक परिस्थिती वगळता १०० लसीकरण झाले आहे. याशिवाय ग्रामीण भागात नागरिकांच्या लसिकरणाचा मोठा टप्पा पार करण्यात आला आहे. जिल्ह्यात २ हजार ६०० हून अधिक शाळा आहेत.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

मागील जवळपास २० महिन्यांपासून विद्यार्थ्यांकरिता शाळा बंद असल्यामुळे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. १ डिसेंबर पासून इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याबाबतचा शासनाचा निर्णय स्वागर्ताह आहे. या निर्णयामुळे सर्व विद्यार्थी पुन्हा एकदा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येतील. शाळा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती समितीने यापूर्वीच राज्य शासनाकडे केली होती.

- लीलाधर ठाकरे, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा नागपूर

ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण नाहीत. यामुळे शाळा सुरू करणे गरजेचे होते. सरकारने चांगला निर्णय घेतला आहे. प्राथमिक शाळेत असलेल्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा पाया मजबूत होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्यक्ष शिक्षणाशिवाय पर्याय नव्हता. आता विद्यार्थी शाळेत येऊन शिक्षण घेणार असल्याने शिक्षकही नव्या उमेदीने अध्यापनाच्या कार्याला गती देतील.

- गणेश शेंबेकर, प्राचार्य, ला.भु. हायस्कूल कोंढाळी, ता. काटोल

loading image
go to top