

Nagpur Digital Arrest
esakal
नागपूर : लखनौ येथील एनआयए आणि एटीएसचे अधिकारी असल्याचे भासवून ८३ वर्षीय वृद्धाला ‘डिजिटल अरेस्ट’ केल्याचा देखावा करीत वृद्ध दाम्पत्याकडून तब्बल ८७ लाख ५० हजार रुपये उकळण्यात आले. याप्रकरणी नागपूर शहर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरमपेठेतील रहिवासी ८३ वर्षीय वृद्ध निवृत्त रेल्वे गार्ड आहेत. १ सप्टेंबरला सायबर ठकबाजांनी त्यांना व्हिडिओ कॉल केला.
त्यांनी स्वतःची ओळख लखनौ येथील एनआयए व एटीएसचे अधिकारी प्रेमकुमार गौतम आणि राहुल कुमार अशी करून दिली. त्यांच्या नावाचा दिल्ली बॉम्बस्फोटाशी संबंध असल्याचे सांगत त्यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम कार्डद्वारे २ कोटी ५० लाख रुपयांचे मनी लॉन्ड्रिंग व्यवहार झाल्याची आणि त्यातून २५ लाख रुपयांचे कमिशन मिळाल्याची बतावणी करून कारवाईची भीती दाखविली.
यानंतर सतत व्हिडिओ कॉलवर ठेवून घराबाहेर पडण्यास मनाई केली. सर्वोच्च न्यायालयाच्या नावाने तयार केलेला बनावट मालमत्ता जप्ती आदेश आणि अटक वॉरंट दाखवून आणखी दबाव निर्माण केला. घाबरलेल्या वृद्धाने विविध बँक खात्यांतून आरटीजीएसद्वारे ८७ लाख ५० हजार रुपये ‘आरबीआयच्या खात्यात जमा’ करण्याच्या नावाखाली ठकबाजांनी सांगितलेल्या खात्यांमध्ये पाठविले. संशय निर्माण झाल्याने दाम्पत्याने सायबर हेल्पलाइन १९३० वर ऑनलाइन तक्रार केली. त्यानंतर नागपूर शहर सायबर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
निवृत्त सहाय्यक कुलसचिवांनाही गंडा ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून नागपूर विद्यापीठाच्या ७० वर्षीय सेवानिवृत्त सहाय्यक कुलसचिवांची सायबर ठकबाजांनी २० लाख १० हजार २०० रुपयांची फसवणूक केली. आरोपींनी व्हिडिओ कॉल करून त्यांच्याविरुद्ध मुंबईत गंभीर गुन्हा दाखल असल्याचे आणि दहशतवादी कारवायांशी त्यांचा संबंध असल्याची बतावणी केली.
तसेच अटक वॉरंट निघाल्याची भीती दाखवली. त्यानंतर त्यांना बंद खोलीत राहण्यास सांगून वारंवार व्हिडिओ कॉल करण्यात आले. मानसिक दबाव टाकून त्यांच्या बँक खात्याची माहिती घेतली. त्यानंतर २३ सप्टेंबरला बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यातून २० लाख १० हजार २०० रुपये आरटीजीएसद्वारे बँक ऑफ इंडियाच्या तारापूर शाखेतील खात्यावर पाठविण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.