नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक बालमृत्यू : आरोग्य क्षेत्रात खळबळ

मेळघाट, गडचिरोलीपेक्षाही भयंकर स्थिती
child death
child death

नागपूर - बालमृत्यूसाठी आदिवासीबहुल दुर्गम गडचिरोली आणि मेळघाट बदनाम आहेत. परंतु, त्यांना मागे टाकण्याचा ‘कहर’ नागपूर जिल्ह्याने केला आहे. राज्यातील सर्वाधिक बालमृत्यूची नोंद होण्याचा ‘कलंक’ नागपूर जिल्ह्याच्या माथ्यावर लागला आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात खळबळ माजली आहे.

बालमृत्यूत घट व्हावी, या हेतूने शासनाने ‘राष्ट्रीय आरोग्य अभियान’ सुरू केले. ‘जननी सुरक्षा योजना’, ‘डॉक्‍टर तुमच्या दारी’ अशा योजनांचा पाऊस पाडला. मात्र, साऱ्या योजना फसव्या ठरत असून पाहिजे त्या प्रमाणात बालमृत्यूंच्या प्रमाणात घट होत नाही. वर्षभरात नागपूर जिल्ह्यात तब्बल १७४१ बालकांना आपला पाचवा वाढदिवस साजरा करता आला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विशेष असे की, राज्यात सर्वाधिक बालमृत्यू हे नागपूर जिल्ह्यातील आहेत. नागपूर जिल्ह्यात ० ते १ वर्षे वयोगटातील १४४० चिमुकल्यांचे मृत्यू १ जानेवारी २०२१ ते मे-२०२२ या कालावधीत झाले आहेत. विशेष असे की, आरोग्यासाठी कोट्यवधींच्या निधीची उधळपट्टी असताना बालमृत्यूंमध्ये पाहिजे त्या प्रमाणात नियंत्रण मिळवता आले नाही.

राज्यात सर्वाधिक बालमृत्यू अमरावतीमधील मेळघाट, गडचिरोली, नंदूरबार अशा आदिवासी जिल्ह्यांमध्ये नोंदविण्यात येत असल्याचे शासनाकडून दरवर्षी सांगण्यात येते. त्यामुळे याच भागात सर्वाधिक मृत्यू होतात, असा समज निर्माण झाला आहे. मात्र, नागपूरसारख्या प्रगत जिल्ह्यात मेळघाट आणि गडचिरोलीच्या तुलनेत जास्त बालमृत्यू झाले आहेत. मुंबई आणि पुण्याच्या तुलनेत ही ही संख्या जादा आहे. इतरही जिल्हे बालमृत्यूमध्ये मागे नाहीत.

श्‍वेतपत्रिका गुलदस्त्यात

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कुपोषणासह बालमृत्यूंसदर्भात श्वेतपत्रिका काढली जाईल, अशी घोषणा दरवर्षी आरोग्य मंत्री यांच्याकडून करण्यात येते. मात्र वर्षोनुवर्षे ही घोषणाच राहते. राज्यात विधिमंडळाची अधिवेशने होतात. मात्र कुपोषण आणि बालमृत्यूसंदर्भातील श्‍वेतपत्रिका कधीच निघत नाही.

एकाच ठिकाणी आठ वर्षे अधिकारी

नागपुरातील शासनाच्या आरोग्य विभागाचे आरोग्य उपसंचालक आठ-आठ वर्षे एकाच ठिकाणी असतात. अशा धोरणांमुळेच अधिकारी वर्ग ढिम्म असून कोणत्याही योजनांची प्रभावी अंलबजावणी करण्यात अपयश येते, हे यावर्षी झालेल्या बालमृत्यूने चव्हाट्यावर आले आहे, अशी टीका सर्व स्तरातून होत आहे.

काही जिल्ह्यातील बालमृत्यू

जिल्हा - ० ते १ वयोगट -१ ते ५ वयोगट

-नागपूर -१४४० -३०१

-मुंबई -११७० -१४७

-औरंगाबाद -११८७ -१६२

-अकोला -१०३३ - ६१

-पुणे -९१२ -१६९

-अमरावती -७११ -१२६

-गडचिरोली - ४४० - ७६

कोट्यवधीचा निधी, तरीही घात

नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेवटच्या टोकापर्यंत उपचार व्यवस्थित पोहचावे, यासाठी कोट्यवधींचा निधी शासनाकडून दिला जातो. ही रक्कम खर्च करण्याचा अधिकार जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना असतो. परंतु वर्षभरात ० ते ५ वर्षे वयोगटातील १७४१ चिमुकले दगावले असताना कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नसल्याची माहिती पुढे आली आहे.

सद्यस्थितीत बालमृत्यूंवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. चिमुकल्यांच्या मृत्यूची कारणे अनेक आहेत. कमी वजनाचे तसेच अपुऱ्या दिवसांचे बाळ जन्माला आल्यानंतर धोका असतो. कुपोषण, न्यूमोनिया, जंतूसंसर्ग तसेच अतिसार आणि श्‍वसनाचे विकार बालमृत्यूस मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतात. वयाच्या पाच वर्षांपर्यंत मुलांना जपले पाहिजे.

-डॉ. विजय धोटे,प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ, नागपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com