Nagpur : स्टाफ सिलेक्शन परीक्षेत डमी उमेदवार बसवून लाटली नोकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अटक

Nagpur : स्टाफ सिलेक्शन परीक्षेत डमी उमेदवार बसवून लाटली नोकरी

नागपूर : स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी)च्या परीक्षेत डमी उमेदवार बसवून नोकरी मिळविणाऱ्या प्राप्तिकर विभागातील नऊ कर्मचाऱ्यांना केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय)च्या नागपूर शाखेने अटक केली. गुप्त माहितीच्या आधारावर सीबीआयने प्रकरणाचा तपास करून या गैरप्रकाराचा पर्दाफाश केला. यामुळे डमी उमेदवार बसवून नोकरी मिळविलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या तृतीय क्षेणीतील झालेल्या परीक्षेत मुन्नाभाई सारखा गैरप्रकार झालेला आहे. अशी एक तक्रार सीबीआयला मार्च २०१८ मध्ये मिळाली होती. यात २०१२ ते २०१४ दरम्यान कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षेत काही लोकांनी बोगस उमेदवारांना बसवून परीक्षा उत्तीर्ण करीत प्राप्तिकर विभागात नोकरी मिळविल्याचा आरोप केला होता. त्यातील सीबीआयला १२ कर्मचाऱ्यांची नावेही माहिती झाली होती.

सीबीआयने या प्रकरणाचा सखोल तपास करण्यास सुरुवात केला. कर्मचारी निवड आयोगाला सर्व १२ उमेदवारांचे पेपर आणि इतरही माहिती मागण्यात आली. संशयित उमेदवारांची सही, हस्तलिखित आणि बोटांचे ठसे घेण्यात आले. फॉरेंसिक तपासात १२ पैकी ९ कर्मचाऱ्यांच्या जागेवर परीक्षा देण्यासाठी बोगस उमेदवार बसल्याचे तपासातून उघडकीस आले.

सोमवारी सीबीआय नागपूरचे डीआयजी सलीम खान यांच्या मार्गदर्शनात प्रकरणाचा तपास करणारे डीवायएसपी संदीप चोगले आणि त्यांच्या पथकाने सर्व ९ आरोपींना अटक केली. मंगळवारी त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सर्वांची १६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. अटकेतील आरोपींमध्ये स्टेनोग्राफर रिंकी यादव, अनील कुमार, राहुल कुमार, अभय कुमार, मुकेश कुमार, चंदन कुमार, मनोज कुमार, प्रदीप कुमार आणि मनीष कुमार यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या सर्वांना नागपूरच्या प्राप्तीकर विभागाने विविध जबाबदाऱ्या दिल्या होत्या.

विभागात उडाली खळबळ

या नऊ कर्मचाऱ्यांवर गुन्हेगारी षडयंत्र, बोगस कागदपत्र बनवणे आणि फसवणुकीच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणामुळे प्राप्तिकर विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे.