
नागपूर- शहरातील पुरामुळे नागनदी ओसंडून वाहू लागल्याने त्याच्या शेजारील अंदाजे १५०० दुकानांमध्ये पाणी शिरल्याने कोट्यवधीचे नुकसान झाले. गणेशोत्सवासह पुढे येणाऱ्या नवरात्री आणि दिवाळीच्या निमित्ताने खरेदी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या मालावर पाणी फिरले आहे. यात किती कोटींचे नुकसान झाले आताच सांगणे कठीण आहे. मात्र, नुकसानीमुळे व्यापारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
शहराचा विकास करताना प्रशासनाने दूरदृष्टी ठेवलेली नसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच हे मोठे नुकसान व्यापाऱ्यांना सहन करावे लागत आहे. हे अतिशय क्लेशदायक आणि दुःखद आहे. तीन तासात १०९ मिली मिटर पाऊस पडल्यानंतर त्याचे नियोजन करणे कठीण आहे.
मात्र, प्रशासन अपयशी ठरले आहे. हे मात्र, मान्यच करावे लागेल असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. नाग नदीच्या तिरावर विदर्भ साहित्य संकुलात अंदाजे २०० पेक्षा अधिक दुकाने बेसमेंटमध्ये आहेत. याशिवाय सीताबर्डी, मोदी क्रमांक एक, दोन आणि तीन याशिवाय गणेश पेठ बस स्थानक, महाल, पंचशील चौक, सेंट्रल मॉल, स्मार्ट बाजार, पत्रकार संघ परिसर, मेहाडीया चौक, जगनाडे चौक ते केडीके कॉलेज परिसरातील दुकानांसह गोडाऊनमध्ये पाणी शिरले. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या मालाचे नुकसान झाले आहे.
सणासुदीच्या काळात अनेकांनी नवीन खरेदी करून आणलेले कपडे, इलेक्ट्रॉनिक्स साहित्य, पुस्तके, डिटर्जंट, धान्य, क्लासेस, वाचनालय, साड्यांचे दुकान, सोने-चांदीचे दुकानातील दागिन्यांसह माल पाण्यात बुडाला आहे. या व्यापाऱ्यांना सरकारने आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा व्यापाऱ्यांची स्थिती अतिशय दयनीय होण्याची शक्यता आहे. आर्थिक मदतीसह पुढील तीन महिने मासिक शुल्कातही सूट देण्यात यावी. विमा नसल्यांनाही मदत देण्यात यावी अशी मागणीही करण्यात येत आहे.
नाग नदीच्या काठावर व आजूबाजूला अंदाजे विविध साहित्यांची १५०० पेक्षा अधिक दुकाने आहेत. नाग नदीने रौद्र रुप धारण केल्यामुळे या सर्व दुकानामध्ये पाणी शिरल्याने कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले आहे. त्यात किती नुकसान झाले हे आताच सांगणे घाईचे ठरणार आहे.
मात्र, या सर्वच व्यापाऱ्यांना सरकारने आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. ज्यांचा विमा आहे. त्यांना त्याची अग्रिम रक्कम तातडीने द्यावी. अन्यथा सर्वच व्यापारी आर्थिक अडचणीत येणार आहे. तसेच ज्या व्यापाऱ्यांचा विमा नव्हता त्यांनाही सरकारने मदत करावी. अन्यथा बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या व्यापाऱ्यांना आता सरकारच तारू शकते.
बी.सी. भरतीया, अध्यक्ष, अखिल भारतीय किरकोळ व्यापारी महासंघ
तीन महिन्यापूर्वीच सीताबर्डीतील संकुलामध्ये बुक डेपो सुरू केला होता. नुकतेच १५ लाखांची पुस्तके आणली होती. स्पर्धा परीक्षांसह इतरही पुस्तकांचे त्यात समावेश होता. व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टीने स्वप्नही बघत होतो. मात्र, एका रात्रीच माझ्या स्वप्नाची राख रांगोळी झाली आणि ढगफुटीमुळे होत्याचे नव्हते झाले. आता काय करावे याची चिंता आहे. दुकानांचा विमाही काढला नव्हता. सरकारने आमचा विचार करावा एवढीच अपेक्षा आहे.
ऋषीकेश तितरे, संचालक,बुक डेपो