नागपूर : जुन्या तारखेचे स्टॅम्प पेपर विकणारे गजाआड

गुन्हे शाखेने सापळा रचून केली ४ वेंडर्सना अटक
Nagpur fraud old date stamp paper seller arrested
Nagpur fraud old date stamp paper seller arrestedsakal

नागपूर : गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयासमोर जुन्या तारखेचे स्टॅम्प पेपर विकणाऱ्या चार वेंडर्सवर छापा टाकून त्यांना अटक केली. ही कारवाई बुधवारी पथकाने केली असून त्यात चौघांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात जुने स्टॅम्पपेपर जप्त केले. दरम्यान त्यांना ६ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

संजय मंगरू रंगारी (वय ५५ रा. योगी अरविंदनगर), विकास श्रीराम धांडे (वय ५१, रा. कस्तूरबानगर), संजय अप्पा हरडे (वय ५७ रा. डोबळे लेआऊट, सूर्यनगर) आणि दिलीप अजाबराव गावंडे (वय ५८ रा. काळे लेआऊट, गोधनी रोड) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयाचे काही वेंडर जुन्या तारखेचे स्टॅम्प पेपर विकत आहेत.

त्या स्टॅम्प पेपरचा उपयोग नंतर ठकबाज प्रॉपर्टी डीलर करतात. जुन्या तारखेच्या स्टॅम्प पेपरवर खरेदी-विक्रीचा व्यवहार दाखवून लोकांची फसवणूक केली जाते, अशी माहिती गुन्हे शाखा युनिट २च्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी अवैधरीत्या जुन्या तारखेचे स्टॅम्प पेपर विकणाऱ्या वेंडर्सना पकडण्याची योजना बनवली. आपल्या पंटरला ग्राहक बनवून पाठविले.

पंटरने १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर खरेदी करण्यासाठी रंगारीशी संपर्क केला. रंगारीने गेल्या वर्षीच्या स्टॅम्प पेपरची किंमत १५०० रुपये सांगितली. पंटर ग्राहकाने स्टॅम्प पेपर खरेदी करण्याची तयारी दाखविली. रंगारीने पंटरला स्टॅम्प पेपर देताच सापळा रचून बसलेल्या पोलिसांनी त्याला पकडले. चौकशीत त्याने धांडेसाठी काम करण्याची माहिती दिली. पोलिसांनी धांडेलाही अटक केली. दरम्यान, पोलिसांना पाहून इतर वेंडर सावध झाले.

गावंडेने त्याच्याजवळील जुन्या तारखेचे स्टॅम्प पेपर हरडेच्या वाहनाच्या डिक्कीत लपविण्यास सांगितले. हरडेने डिक्कीत स्टॅम्प पेपर ठेवताच पोलिसांनी त्यालाही अटक केली. झडतीत गावंडे आणि हरडेजवळ ५०० रुपयांचे तीन आणि १०० रुपयांचा एक स्टॅम्प पेपर मिळाला. सर्वांवर जुन्या तारखेची नोंद होती. चारही आरोपींना अटक करून सदर ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपासासाठी आरोपींना सदर पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.

प्रॉपर्टी डीलरकडून पाचपटीने वसुली

महिना संपताच सर्व वेंडर्सना स्टॅम्प पेपर परत करायचे असतात, मात्र, काही वेंडर्स स्टॅम्प पेपर परत करीत नाही. नंतर आवश्यकता पडल्यास प्रॉपर्टी डीलर त्यांच्याशी संपर्क करून चार ते पाच पट किंमतीत ते स्टॅम्प पेपर खरेदी करतात. त्यातूनच हा व्यवसाय चांगला फोफावला असल्याची माहिती समोर आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com