नागपूर : चित्रा वाघ यांचा अजित पवारांना टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chitra Wagh criticism on Ajit Pawar

नागपूर : चित्रा वाघ यांचा अजित पवारांना टोला

नागपूर - गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती बघण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आधीच जाऊन आले. राज्यातील अतिवृष्टी झालेल्या गावातील पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे. आमचे सरकार उंटावरून शेळ्या हाकत नसल्याचे सांगून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी विरोधीपक्षनेते अजित पवार यांना टोला हाणला.

दोन दिवसांपूर्वी अजित पवार विदर्भाच्या दौऱ्यावर होते. त्यांनी पूरग्रस्त गावांचे अद्याप पंचनामे झाले नसल्याचा आरोप सरकारवर केला होता. त्यास शनिवारी चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले. नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. पंचनामे करण्याचे आदेश आधीच देण्यात आले असून त्यानुसार पन्नास टक्के पंचनामे झाले असल्याचा दावा त्यांनी केला.

उरमेडमध्ये एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची दखल घेऊन मुलीच्या कुटुंबीयांना भेट व सांत्वन करण्यासाठी त्या शनिवारी नागपूरला आल्या होत्या. नागपूर विमानतळावर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी नागपूर ग्रामीण पोलिसांचे कौतुक केले. घटनेची तक्रार नसताना पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेतला. प्रकरणाचा तपास करून आरोपींना हुडकून काढले.

त्यामुळे ते कौतुकास पात्र ठरतात. मनोधैर्य योजनेंतर्गत पीडित मुलीस व तिच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर आर्थिक मदत द्यावी अशी विनंती आम्ही संबंधित विभागास करणार आहोत. सोबतच भाजपच्या आपदा विभागाच्यावतीनेसुद्धा आर्थिक मदत केली जाणार असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये प्रामुख्याने उपस्थित होते.

राज्यपालांच्या वक्तव्यावर सावध प्रतिक्रिया

महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला आम्ही महाराष्ट्रीयनच समजतो. मराठी-हिंदी भाषिक असा आम्ही भेद करीत नाही. महाराष्ट्राच्या विकासात प्रत्येकाचेच योगदान आहे. सर्वच पक्षात विविध जाती, धर्म आणि राज्यातील लोकांचा भरणा आहे असे सांगून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावर चित्रा वाघ यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली.