हॉटेल्स, मॉल्स सुरू, क्रीडा स्पर्धा का नाही | Nagpur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रीडा स्पर्धा का नाही?

नागपूर : हॉटेल्स, मॉल्स सुरू, क्रीडा स्पर्धा का नाही?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्य शासनाने उशीरा का होईना खेळाडूंच्या सरावाला परवानगी दिली. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊनही क्रीडा स्पर्धांना अद्याप हिरवी झेंडी मिळाली नाही. त्यामुळे खेळाडूंसह प्रशिक्षक व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सध्या नाराजी आहे. हॉटेल्स, मॉल्स व जिम सुरू होऊ शकतात, मग क्रीडा स्पर्धा का नाही? असा सवाल करत त्यांनी इनडोअर व आऊटडोअर स्पर्धांना लवकरात लवकर परवानगी द्यावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे.

गतवर्षी कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून शहरातील बहुतांश क्रीडा स्पर्धा बंद आहेत. त्यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंना फटका बसतो आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून, तज्ज्ञांच्या मते तिसरी येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ‘स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज’ पूर्ववत व्हाव्यात, असे शहरातील खेळाडू व प्रशिक्षकांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी ‘सोशल डिस्टन्स’च्या अटींवर सरावाला परवानगी दिली. त्यामुळे खेळाडू नियमित सराव करीत आहेत. मात्र क्रीडा स्पर्धांना अद्याप हिरवी झेंडी दाखविण्यात न आल्याने त्यांच्यात नाराजीचे वातावरण आहे. केवळ सराव पुरेसा नाही. स्पर्धाही होणे तितकेच आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: राष्ट्रीय अकादमीचे प्रमुख लक्ष्मण होणार; सौरव गांगुली

उल्लेखनीय म्हणजे, राज्यात शाळा व महाविद्यालयेही सुरू झाली आहेत. शिवाय हॉटेल्स, मॉल्स, जिम, बसेस आणि चित्रपटगृहेदेखील पूर्वीप्रमाणे नियमित सुरू आहेत. त्याच धर्तीवर खेळांनाही परवानगी मिळावी, अशी खेळाडू व प्रशिक्षकांची मागणी आहे. शासनाकडून परवानगी मिळाल्यास पावणे दोन वर्षांपासून रखडलेल्या शालेय व महाविद्यालयीन स्पर्धा पुन्हा सुरू होऊ शकतात. आधीच कोरोनामुळे खेळाडूंचे प्रचंड नुकसान झाले आहे. वेळोवेळी लागलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांपासून वंचित राहावे लागले. शासनाने लवकर निर्णय न घेतल्यास भविष्यात त्यांना आणखी फटका बसू शकतो.

क्रीडामंत्र्यांनी पुढाकार घेण्याची गरज

परिस्थिती नॉर्मल झाल्यामुळे क्रीडा स्पर्धा सुरू करण्यासाठी ही योग्य वेळ असल्याचे खेळाडू व प्रशिक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी यासंदर्भात ताबडतोब सकारात्मक निर्णय घेऊन स्पर्धा सुरू कराव्यात, अशी क्रीडा जगतातून मागणी होत आहे. क्रीडामंत्र्यांनी पुढाकार घेतल्यास स्पर्धा होऊ शकतात.

'शासनाने केवळ सरावाला परवानगी दिली आहे. क्रीडा स्पर्धांबाबत अद्याप कसलाही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे खेळाडूंमध्ये सध्या नाराजी आहे. शासनाने परवानगी दिल्यास भविष्यात नागपुरात विविध स्पर्धा होऊन, खेळाडूंचे नुकसान काही प्रमाणात भरून निघू शकते.'

-डॉ. शरद सुर्यवंशी, संचालक, शारीरिक शिक्षण विभाग (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ)

loading image
go to top