उद्योग आले पूर्वपदावर : ९० टक्के लसीकरण पूर्ण | nagpur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

industry
उद्योग पूर्वपदावर

नागपूर : उद्योग आले पूर्वपदावर : ९० टक्के लसीकरण पूर्ण

नागपूर : कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून शासनाने सर्वंच नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील उद्योगजगत पूर्वपदावर आले आहे. दिवाळीच्या सुटीवर गेलेले कामगारही कामावर परतले आहे. कामावरील ९० टक्क्यांपेक्षा जास्त कामगारांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. कच्‍च्या मालाचे वाढलेले दर उद्योजकांना त्रस्त करीत असले तरी उद्योग सुरळीत सुरु झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य फुलले आहे.

हेही वाचा: नागपूर : ‘बिन फ्री’च्या नादात शहरच झाले ‘डस्टबिन’

कोरोना काळात लावण्यात आलेल्या टाळेबंदीत सर्व व्यवहार बंदच होते. संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत केवळ १५ ते २० टक्केच उद्योग सुरू होते. ज्या उद्योगांमधील कामगारांची राहण्याची व्यवस्था उद्योगाच्या आवारातच आहे, तेथील उद्योगांना परवानगी देण्यात आली होती. करोना संसर्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा चांगलाच फटका जिल्ह्यातील उद्योगाला बसला होता. सूक्ष्म, लघु उद्योग चांगलेच अडचणीत आले होते. यातून धडा घेत संभाव्य तिसऱ्या लाटेतही जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील उद्योग सुरू ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या. त्यामध्ये कामगारांचे प्राधान्याने लसीकरण, कामगारांची उद्योगांच्या परिसरातच राहण्याची व्यवस्था आदींचा समावेश होता.

अनेक औद्योगिक असोसिएशनने पुढाकार घेऊन कामगारांचे लसीकरण करून घेतले. त्यासाठी शिबिरेही आयोजित केली होती. दुसरी लाट ओसरू लागल्यानंतर जून महिन्यापासून कोरोनाचे नियम पाळून उद्योग पुन्हा सुरू होण्यास सुरवात झाली. या कालावधीत ७० ते ७५ टक्के उद्योग सुरू झाले होते. ६० ते ६५ टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्यास मुभा होती. मात्र, दुसऱ्या बाजूला कामगारांचे लसीकरण करणे व्यवस्थापनाला बंधनकारक करण्यात आले. ऑगस्ट महिन्यापासून बाजारात मालाची मागणी वाढू लागल्याने कंपन्यांना उत्पादन वाढवण्यासाठी अधिकाधिक मनुष्यबळाचे लसीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यातील उद्योगजगत पूर्वपदावर आले आहे. ९० टक्क्यांपेक्षा जास्त कामगारांचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध उद्योगांची संख्या दीड हजाराच्या जवळपास आहे. त्यात एक लाखाच्या जवळपास कामगार कार्यरत आहेत. जिल्ह्यात बुटीबोरी, हिंगणा, कळमेश्वर, मौदा, कामठी, उत्त्पलवाडी, मिहान, सदर आयटी पार्क, परसोडी आयटी पार्क आहेत.

जिल्ह्यातील उद्योग पूर्वपदावर आले असून उत्पादनही वाढले आहे. ९० ते ९५ टक्के कामगार परतले आहेत. कच्चा मालाच्या दरात चढ उतार होत असले तरी मागणी वाढलेली आहे. त्यामुळे उत्पादनातही वाढ झालेली आहे. कामगारांचे लसीकरण करण्यासाठी आमच्या असोसिएशनने अनेकदा शिबिर घेतले. काही उद्योगांमध्येही लसीकरण मोहीम राबविली होती. प्रदीप खंडेलवाल, अध्यक्ष, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन.

loading image
go to top