नागपूर : सिंचन,आरोग्य रडारवर

तीन विभागांची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी
Nagpur Irrigation health Inquiry Divisional Commissioner
Nagpur Irrigation health Inquiry Divisional Commissionersakal

नागपूर : पंचायत राज समितीने (पीआरसी) उपस्थित केलेल्या मुद्यांवर समाधानकारक उत्तर न देता आल्याने सिंचन व आरोग्य विभागाच्या सचिवांची साक्ष नोंदविण्याचे आदेश अध्यक्ष संजय रायमुलकर यांनी दिले. तर तीन विभागांची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश समितीने दिले. यामुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे.

वर्ष २०१७-१८ या काळात जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून राबविण्यात आलेल्या योजना झालेल्या खर्चाचा लेखाजोख्याचा आढावा पीआरसीने घेतला. चार तास कसून आढावा घेण्यात आला. सर्वच विभागातील अधिकाऱ्यांची साक्ष घेण्यात आली. त्यांच्या मदतीसाठी तत्कालीन अधिकाऱ्यांनाही बोलावून घेण्यात आले होते. समितीने अनेक बाबतीत आक्षेप घेत काही सूचनाही केल्या. आरोग्य विभागाकडून खरेदी करण्यात आलेल्या औषधाचा मुद्दा त्यांना खटकला. याबाबत त्यांनी विभाग प्रमुखांनी विचारणा करण्यात आली. परंतु त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. यावर समितीने नाराजी व्यक्त करत सचिवांची साक्ष नोंदविण्याचे निर्देश दिले. सिंचन विभागाच्या कामावरही त्यांनी आक्षेप घेतले. निविदा प्रक्रिया, काम व झालेल्या खर्चाबाबतच्या प्रश्नावर समितीसमोर विभाग प्रमुखांना उत्तर देता आले नाही. त्यामुळे सिंचन विभागाच्या सचिवांचीही साक्ष नोंदविण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

तर सिंचन, ग्रामीण पाणी पुरवठा व आरोग्य विभागासंदर्भातील काही मुद्यांसंदर्भात विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. काही मुद्यांवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

सीईओंनी लढविला किल्ला

सीईओ कुंभेजकर यांनी मोठी मेहनत घेतली. सर्व मुद्यांवरची माहिती स्वतःकडे ठेवली. पीआरसीकडून उपस्थित करण्यात आलेल्या मुद्यांवर उत्तर दिले. काही मुद्यांवर विभागप्रमुखांची अडचण झाली असता त्यांनी उत्तर देत बाजू सांभाळून घेतली. त्यांनी एकहाती किल्ला लढविला. परंतु काही प्रकरणात विभाग प्रमुखांनाच उत्तर देण्यास सांगण्यात आले. त्यामुळे काही प्रकरणात अडचण झाली.

इतिवृत्त आल्यावर कारवाई

पीआरसीकडून आढावा घेण्यात येतो. अनेक विषयांवर त्यांच्याकडून अहवाल मागविण्यात येतो. काही प्रकरणात चौकशी आणि सचिवांची साक्ष नोंदविण्यावर चर्चा होते. बैठकीबाबतचे इतिवृत्त तयार होऊन ते अनुपालनासाठी जिल्हा परिषदेकडे येते. या इतिवृत्तात काय नमुद आहे, हे महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगानेच कार्यवाही करण्यात येते, असे प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.

सीईओंचे कार्य प्रशंसनीय

पीआरसीकडून नोंदविण्यात आलेल्या आक्षेपांची पूर्तता करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी विशेष मेहनत घेतली. त्यामुळे अनेक अडचणीचे मुद्दे निकाली निघाले. पीआरसीसमोर मुद्देसूद अनुपालन अहवाल सादर केल्याबाबत पीआरसीचे अध्यक्ष व सदस्यांनी अभिनंदन केले. त्यांनी ग्रामीण भागातील रुग्णांच्या उपचारासाठी टेली मेडिसिन उपक्रम सुरू केला. या उपक्रमाबाबत समितीने त्यांचे कौतुकही केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com