नागपूर : एप्रिलमध्येच सिंचन प्रकल्प कोरडे

जलसाठा अर्ध्यावर : वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती
कोरडे पडत असलेले सावनेर उपविभागातील सिंचन प्रकल्प.
कोरडे पडत असलेले सावनेर उपविभागातील सिंचन प्रकल्प.Sakal

केळवद - सावनेर उपविभागातील चार मध्यम जलाशय आणि आठ लघुप्रकल्प यावर्षी मुसळधार पाऊसामुळे तुडूंब भरले होते. यात नांदा, रायबासा, उमरी हे प्रकल्प शंभर टक्के भरले होते. त्यामुळे यावर्षी सावनेर उपविभागातील जलाशयातील पाण्याचा साठा कमी होणार नाही, असा अंदाज असताना ऐन एप्रिल महिन्यात तप्त उन्हाचा पारा ४२ ते ४४ डीग्री सेल्सीअंश इतका वाढल्याने पुढील मे ते जुन महिन्यात उन्हाचा पारा वाढतच राहला तर जलाशयातील पाणीसाठा शून्य टक्यावर येईल , अशी अवस्था निर्माण झालेली आहे.

यावर्षी पाऊस दमदार झाल्याने तालुक्यातील सर्वच जलाशय हे धोक्याच्या पातळीच्यावर भरलेले होते. त्यामुळे दरवर्षी किमान मे अथवा जुन महिन्यात जलाशयातील पाण्याची पातळी कमी होते. मात्र यावर्षी एप्रिल महिन्यात उन्ह वाढल्याने तालुक्यातील जलाशयांची पाण्याची पातळी कमी झालेली आहे. त्यामुळे ज्या जलाशयातून पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो, अश्या जलाशयातील पाणी कमी झाल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याचा बिकट प्रश्न निर्माण होऊ शकतो. जंगलातील वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी गावाकडे प्रस्थान करावे लागणार आहे. जलाशयातील पाणीसाठा कमी झाल्याने वन्यप्राण्यांपुढे पिण्याचा पाण्याची मोठी समस्या निर्माण झालेली आहे.

भारनियमनामुळे पाणीपुरवठा विस्कळीत

ग्रामीण भागात ‘लोडशेडिंग’ सुरू आहे. आठवड्यातून चार दिवस दिवसाला आठ तास विद्युत पुरवठा दिला जातो. त्यातही विजेच्या अतिभारामुळे डीओ उडणे, फ्यूज जाणे असे प्रकार वारंवार होत असल्याने विद्युत प्रवाह खंडित होतो. त्यामुळे गावकऱ्यांना पाणी पुरवठा करणे शक्य होत नाही, असे मत जिल्हा परिषद सदस्य छाया बनसिंगे, खुबाळा, रिसाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच यादवराव ठाकरे, बिचवा ग्रामपंचायतच्या सरपंच श्रीमती सुके, पंचायत समिती सदस्य गणेश काकडे, गोविंदराव ठाकरे आदींनी ‘सकाळ’ जवळ व्यक्त केले. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी महावितरणने आठ तासाऐवजी बारा तास विद्युत मिळेल, अशी व्यवस्था करावी, जेणेकरून गावातील पाणी टाकी भरतांना सोयीचे होईल किंवा ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठ्यासाठी एस्ट्रा ट्रॉंसफार्मर बसविण्याची व्यवस्था करावी अशी मागणी गाव पातळीवरून बहुतांश सरपंच मंडळीच्या वतीने केली जात आहे.

चोरखैरीत पाणीपुरवठा योजनेची गरज

सावनेर तालुक्यातील एप्रिल महिन्यातही सध्याची पाणीटंचाई सदृश्य स्थिती असल्याचे जलप्रकल्पातील पाणीसाठा व पाण्याचे स्त्रोतावरून दिसून येत आहे, असे जरी असले तरी तालुक्यातील रायवाडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या २३ घरांच्या चोरखैरी वस्तीला पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीवरून पाणी भरावे लागत आहे. त्यामुळे येथील लोकांनी आमच्याही वस्तीत पाणी पुरवठायोजना राबवून नळाद्वारे पाणी देण्याची मागणी रायवाडी ग्रामपंचायत व संबंधित विभागाला केली आहे. उष्णतेच्या लाटेमुळे सर्वत्र पाण्याच्या मागणीत व विजेच्या मागणीत वाढ होणे सहाजिकच आहे. परंतु नागरिकांसाठी या दोन्ही आवश्यक गरजा असल्याने गरजेच्या पूर्ततेसाठी योग्य नियोजनाची तितकीच गरज आहे. उन्हाळ्याच्या दिवसात बऱ्याच ठिकाणी गावपातळीवरील पाण्याचे स्त्रोत नदी, नाले, विहिरी, बोरवेल व जलप्रकल्प कोरडे पडतात, तर कुठे पाणी पातळी अल्प असते. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण होते.

उन्हाच्या तडाख्यात सावलीचा ‘आधार’

सध्या जीवाची लाहीलाही करणारे उन्ह तापत आहे. सूर्य सकाळपासूनच आग ओकत असल्याने उकाड्यापासून माणसांसोबतच पशुपक्षीही हैराण झाले आहेत. उन्हाच्या चटक्यामुळे अंगाची लाही-लाही होत आहे. झाडाझुडुपांच्या सावलीत दुपारच्या वेळी जनावरे थांबत आहे. पशुपक्षी अन्नपाण्याच्या शोधापेक्षा झाडांच्या सावलीचा आधार शोधत असल्याने झाडांचे महत्त्व किती आहे, हे फक्त उन्हाच्या तीव्रतेतून झाडांच्या गार सावलीत गेल्यानंतरच कळत आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. वाढत्या उष्णतेमुळे दुपारच्या वेळेस मानवी जीवनही शांत होत आहे. वाढत्या तापमानामुळे पशुधनाचे हाल होत आहेत. नेहमी अन्न पाण्याच्या शोधार्थ वणवण भटकणारे प्राणी झाडांच्या सावलीचा आधार घेत आहेत. दुपारच्या वेळेस वृक्षांच्या दाट छायेखाली संथपणे रवंथ करत ठिकठिकाणी पशू दिसत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com