

Nagpur Crime
Sakal
‘न्यूरो ट्रेड’च्या नावाखाली १५.३७ लाखांचा गंडा; व्यावसायिकाची सायबर चोरट्याकडून फसवणूक
नागपूर, ता. ११ ः दररोज ५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवित, एका व्यावसायिकाची १५ लाख ३७ हजार २०० रुपयांनी ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी नागपूर शहर सायबर पोलिसांनी सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहेत.
महेश गिरिजाशंकर जयस्वाल (वय ५६, रा. राजनगर) यांना ४ नोव्हेंबर २०२५ ला घरी असताना, ‘न्युरो ट्रेड आयए’ नावाच्या एका व्हॉट्सॲप ग्रुपवर गुंतवणुकीबाबत माहिती आली. यावेळी राजकुमार नामक एका व्यक्तीने त्यांना स्वतःला गुंतवणूक सल्लागार म्हणून ओळख देत गुंतवणूक केल्यास १ ते ५ टक्के प्रतिदिवस नफा मिळेल, असे आमिष दाखविले. त्यावर विश्वास बसल्याने त्यांनी होकार देताच, त्यांना बनावट वेबसाइट आणि लिंक पाठवली. सुरुवातीला थोडी रक्कम परत देऊन विश्वास संपादन करण्यात आला आणि त्यानंतर हळूहळू मोठ्या गुंतवणुकीस प्रवृत्त करण्यात आले. महेश जयस्वाल यांनी सुरुवातीला ५० हजार टाकले. त्यानंतर नोव्हेंबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत जयस्वाल यांनी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे पाठवले. ५० हजार, १ लाख, दीड लाख, ७.५० लाख अशा रकमा जमा होत एकूण गुंतवणूक १५.३७ लाखांवर पोहोचली. मात्र, पैसे काढण्याचा प्रयत्न करताच वेबसाइट अचानक बंद झाली आणि व्हॉट्सॲपवरील सर्व संपर्क तुटला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने १९ डिसेंबर २०२५ रोजी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली. प्राथमिक चौकशीनंतर ९ जानेवारी २०२६ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. माहिती तंत्रज्ञान कायदा व भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सायबर चोरट्याचा शोध सुरू केला आहे.
भूलथापांना बळी पडू नका : सायबर पोलिस
सायबर पोलिस आरोपींच्या बँक खात्यांचे व्यवहार, मोबाईल नंबर आणि डिजिटल ट्रेल तपासत असून हे आंतरराज्यीय किंवा आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेट असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अतिरिक्त परताव्याच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.