Gram Panchayat Election : सरपंच उमेदवाराच्या खिशाला कात्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gram Panchayat Election

Gram Panchayat Election : सरपंच उमेदवाराच्या खिशाला कात्री

मौदा : तालुक्यातील २५ ग्रा.पं.च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यावेळी सरपंचपदासाठी थेट जनतेतून निवड होणार आहे. सरपंच उमेदवाराला आपल्या पॅनलच्या सदस्यांचा सर्वच खर्च करावा लागत असल्यामुळे खिशाला मोठी कात्री लागल्याचे दिसत आहे. जात प्रामाणीकरणपासून तर घर टॅक्स भरण्यासाठी तारेवरची कसरत सरपंच उमेदवाराला करावी लागत आहे.

अर्ज भरवण्याच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशीही तालुक्यातील सरपंचपदासाठी एकूण १९अर्ज दाखल झाले आहेत. सदस्य पदासाठी एकूण ५२अर्ज दाखल झाले आहेत. सरपंचपदासाठी सर्वाधिक तारसा येथून ६ अर्ज आले आहेत. सदस्य पदासाठीही तारसा येथून एकूण २१अर्ज दाखल झाले आहेत.

निवडणूक विभागाच्या वतीने ग्रामपंचायतच्या निवडणुकीची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्यामुळे इच्छुकांनी गावचे राजकारण आपल्या ताब्यात घेण्यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. तालुक्यात २५ ग्रा.पं.चा कार्यक्रम जाहीर झाला.

सोमवारपासून नामनिर्देशपत्राला सुरुवात सुद्धा झाली. मौदा तहसील कार्यालयात उमेदवारांची गर्दी दिसू लागली. बाहेर एकमेकांना समजवण्याचा प्रयत्न सुद्धा केला जात आहे. कोणत्या उमेदवारांना निवडून आणायचे अन् कोणत्या उमेदवारांना पाडायचे ही सुद्धा रणनिती आखली जात आहे.

सरपंच पदासाठी दोन, सदस्यासाठी तीन अर्ज

कामठीः पहिल्या दिवशी सोमवारला भिलगावमधून सदस्याकरीता एक तर दुसऱ्या दिवशी मंगळवारी गादा, गुमथला व भोवरीमध्ये सर्व साधारण वर्गातून प्रत्येकी एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. सोबतच मंगळवारी सरपंच पदाकरिता गादा व लिहिगावमधून प्रत्येकी एक उमेदवारांनी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे. तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज दुसऱ्या दिवशी सरपंच पदासाठी दोन तर सदस्यासाठी तीन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला.

त्यानुसार गादाच्या सरपंचपद सर्वसाधारण जागेसाठी राखीव असून त्याकरिता देशमुख हेमंत मुकडराव यांनी तर लिहीगावचे सरपंचपद अनुसूचित जाती महिलेकरीता राखीव असून सरपंच पदासाठी शितल गजभिये यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. गादा ग्रा.पं.प्रभाग क्रमांक एक सर्वसाधारण जागेतून दुर्योधन धर्मराज जुनघरे, गुमथळा ग्रा.पं.प्रभाग क्रमांक चार सर्वसाधारण जागेतून सुमित चव्हाण, भोवरी ग्रामपंचायत वार्ड क्रमांक तीन सर्वसाधारण जागेतून दिगंबर धुळस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

मौदा तालुक्याची एकंदर स्थिती

मौदा तालुक्यातील २ ग्रा.पं.साठी सरपंच व ग्रा.पं.सदस्य या पदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने निवडणुकीचे नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा कालावधी २८ ते २ डिसेंबर सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आहे.

स्वतंत्र कक्षाची उभारणी

सध्या तरी प्रशासनाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी केली असून अर्ज दाखल करून घेण्यासाठी स्वतंत्र कक्षाची उभारणी प्रत्येक तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आली आहे.

तालुक्यासाठी १०निवडणूक निर्णय अधिकारी आहेत व प्रत्येकाला 1१०सहायक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक भयमुक्त, शांततेत व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व उपाययोजना प्रशासन मौदाकडून करण्यात आल्या आहेत.

- मलिक वीराणी, तहसीलदार, मौदा