Nagpur : बेशिस्त नागपूरकरांवर तीस लाखांचा दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Municipal Corporation

Nagpur : बेशिस्त नागपूरकरांवर तीस लाखांचा दंड

नागपूर : सार्वजनिक ठिकाणी थुंकणे तसेच उघड्यावर लघवीसह कचरा टाकणाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी महापालिकेने मागील महिन्यापासून दंडात्मक कारवाई सुरू केली. महिनाभरात महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सहा हजार ५०६ जणांवर कारवाई करीत ३० लाख १७ हजार रुपयांचा दंड वसूल केला. दरम्यान, शुक्रवारीही २१५ जणांवर कारवाई करीत ८६ हजार ४० रुपयांचा दंड आकारला.

स्वच्छता मानांकनात घसरण झाल्यानंतर महापालिकेने स्वच्छता गांभीर्याने घेतली असून मागील ११ ऑक्टोबरपासून रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणारे नागरिक, दुकानदार, रुग्णालये, मंगल कार्यालयांना शिस्त लावण्यासाठी धडक कारवाई सुरू केली. या कारवाईला आज महिना पूर्ण झाला. महिनाभरात महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने ३० लाख ७० हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला. या काळात ६ हजार ५०६ जणांवर कारवाई केली.

शुक्रवारी रस्त्यावर थुंकणाऱ्या दोघांकडून चारशे रुपये दंड वसूल करण्यात आला तर उघड्यावर लघवी करणाऱ्या दोघांकडून प्रत्येकी पाचशे रुपयांप्रमाणे एक हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी आज रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या दुकानदारांवर ४४ प्रकरणांची नोंद करून १७ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला. या सर्वांवर प्रत्येकी ४०० रुपये प्रमाणे दंड आकारण्यात आला. रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या ७० व्यक्तींवर प्रत्येकी १०० असा ७ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. याशिवाय शैक्षणिक संस्था, हॉटेल्स, मंगल कार्यालये, पॅथलॅब यांच्यावरही कारवाई करण्यात आली.

श्वानमालकावर दंड

महापालिकेने प्रातःविधीसाठी रस्त्यावर श्वान घेऊन फिरणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई सुरू केली. दोनशे रुपयांचा दंड श्वान मालकांवर ठोठावण्यात येत आहे. आजही श्वान मालकांकडून दंड वसूल करण्यात आला.