नागपूर : स्मार्ट सिटीचा प्रवास दुष्काळाकडे

पावसाचे पाणी जिरवण्यात महापालिका फेल : ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ बाबत उदासीन
file photo
file photosakal

नागपूर : भविष्यात शहराची लोकसंख्या वाढणार आहे. सद्यस्थितीत नागपूरकरांसाठी पाण्याचा साठा मर्यादित आहे. पुढच्या काळात पाण्याची निकड लक्षात घेता महापालिकेने ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रत्येकाला बंधनकारक करणे आवश्यक आहे. परंतु साडेसहा लाख मालमत्तेच्या शहरात केवळ दीडशे ते दोनशे लोकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग केले आहे.

स्वच्छतेप्रमाणे रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत गंभीर नसल्याने दुष्काळाकडे स्मार्ट सिटीची घोडदौड सुरू असल्याचे चित्र असून भविष्यात नागपूरकरांना पाण्याच्या गंभीर संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

नागपूरकरांना तोतलाडोह व नवेगाव खैरी जलाशयातून पाणीपुरवठा होतो. गेली दोन वर्षे चांगला पाऊस झाल्याने जलसंकट टळले. यंदाही उन्हाळ्यात पाण्याचे संकट नसल्याचेच संकेत मिळत आहे. परंतु पावसाचा लहरीपणा सुरूच असून दरवर्षी पावसाच्या प्रमाणात घट होत आहे. यामुळेच २०१९ मध्ये महापालिकेवर दिवसाआड पाणीपुरवठ्याची वेळ आली होती.

यातूनही महापालिकेने बोध घेतल्याचे चित्र नाही. नागरिकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यास मालमत्ता करातील सामान्य करात सुट देण्याची योजना महापालिकेने सुरू केली आहे. मात्र, जनजागृती अभावी सामान्य नागरिकांपर्यंत अद्यापही ही योजना पोहोचली नाही.

नव्या घराच्या बांधकामाचा नकाश मंजूर करताना रेन वॉटर हार्वेस्टिंगची सुविधा करणे बंधनकारक असल्याचे नगर रचना विभागाचे अधिकारी संबंधित घरमालकास सांगतात. पण घरमालकाने रेन वॉटर हार्वेस्टिंग केले की नाही, याबाबत तपासणीची यंत्रणाच महापालिकेकडे नाही. रेन वॉटर हार्वेस्टिंग होत नसल्याने पावसाचे पाणी वाहून जात असून शहराचा भूगर्भही कोरडा होत आहे. परिणामी पावसाने दगा दिल्यास नागपूरकरांवर भविष्यात मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज्य शासनाचे निर्देशही गुंडाळले

पाणी टंचाईचे संकट बघता राज्य शासनाने ७ जून २००७ मध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याबाबत अधिसूचना काढली. परंतु याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले. या अधिसूचनेची परिणामकारक अंमलबजावणी होत नसल्याने राज्य शासनाने पुन्हा १७ जून २०१६ रोजी अधिसूचना काढली अन महापालिकांना काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. परंतु महापालिकेने राज्य शासनाचे निर्देशच धुडकावल्याचे चित्र आहे.

शासकीय कार्यालये, लोकप्रतिनिधींकडेही अभाव

पालिकेसह शहरातील अनेक शासकीय कार्यालयांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग नाही. महापालिकेच्या दोन झोन कार्यालयात ही सुविधा आहे. शहरातील आमदार, खासदारांच्या घरीही वॉटर हार्वेस्टिंग नाही. त्यामुळे महापालिकेने शहरातील सेलिब्रिटी व लोकप्रतिनिधींना रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यास आग्रह धरण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

तापमान रोखण्याची किमया

रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे झाडेही हिरवीगार राहतात. शहरातील वाढत्या तापमानाला रोखण्याची किमयाही रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये आहे. परंतु एकूणच या योजनेकडे महापालिकेचे होणारे दुर्लक्ष शहराच्या पर्यावरणासाठीही धोकादायक आहे. सिमेंट रस्त्यांमुळे शहराचे तापमान वाढण्याची शक्‍यता बळावली आहे. या स्थितीत रेन वॉटर हार्वेस्टिंगची गरज असूनही त्याकडे दुर्लक्षाचे गंभीर परिणाम नव्या पिढीला भोगावे लागण्याची शक्‍यता आहे.

रेन वॉटर हार्वेस्टिंग एकप्रकारे शहरासाठी फुप्फुसाचे काम करते. पावसाचे पाणी जमिनीत मुरल्यास भूजल पातळी वाढून पाण्याची कमतरता भासणार नाही. उन्हाळ्यातच नव्हे तर केव्हाही हे पाणी नागरिकांना बोअरवेल किंवा विहिरीच्या माध्यमातून वापरता येईल. शहरात महापालिका किंवा ग्रामीणमध्ये नगर परिषदेला नकाशे मंजूर करताना रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करते. परंतु या निर्देशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

- डॉ. प्रवीण महाजन,जलतज्ज्ञ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com