
नागपूर : बालरोग विभागातील अग्निशमन यंत्र मुदतबाह्य
नागपूर : जानेवारी २०२१ मध्ये भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशू केअर युनिटमध्ये मध्यरात्री लागलेल्या आगीत १० बाळांचा मृत्यू झाला होता. ‘पुढच्यास ठेस, मागचा शहाणा’ असे म्हणतात, मात्र शासन- प्रशासनाला या घटनेचे गांभीर्य दिसत नाही. यामुळेच मेडिकलमधील बालरोग विभागातील अग्निशमन यंत्र मुदतबाह्य झाल्यानंतरही त्याकडे कोणाचेही लक्ष गेलेले नाही.
मेडिकलमध्ये वॉर्ड क्रमांक ३, ५ हे वॉर्ड मुलांचे वॉर्ड आहेत. येथे प्रत्येक वॉर्डात पन्नासच्यावर चिमुकले भरती असतात. विशेष असे की, या वॉर्डांत कप्पे लावलेले आहेत. यामुळे अनुचित घटना घडल्यास मोठा धोका होऊ शकतो. बालरोग वॉर्डांमध्ये अग्निशमन यंत्र मुदतबाह्य झाल्याची मेडिकलच्या वैद्यकीय अधीक्षक कार्यालय प्रशासनाला याची माहितीच नाही. प्रशासनाकडून फायर ऑडिटवर कोट्यवधीचा खर्च करण्यात येतो. मात्र मुदतबाह्य अग्निशमन यंत्रांकडे प्रशासनचे लक्ष नसणे धोक्याचे संकेत देणारे ठरते.
रुग्णालयातील आगीच्या घटना
२३ एप्रिल २०१९ मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक ४९ जवळच्या झुडुपाला आग
९ जानेवारी २०२१ भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आग, १० नवजात अर्भकांचा मृत्यू
२६ मार्च २०२१ भांडूप येथील ड्रीम मॉलमधील कोरोना केअर सेंटरमध्ये आग, ११ जणांचा बळी
९ एप्रिल २०२१ नागपुरातील वाडी येथील वेल्ट्रिट कोविड सेंटरमध्ये ४ जणांचा मृत्यू
२१ एप्रिल २०२१ नाशिकमधील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात आग, २४ जणांचा मृत्यू
२३ एप्रिल २०२१ विरार येथील वल्लभ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आग, १३ जणांचा बळी
६ नोव्हेंबर २०२१ नगर जिल्हा रुग्णालयातील कोरोना अतिदक्षता विभागात आग,१४ जण दगावले
रुग्णांचे नातेवाईक चिंतेत
या वॉर्डात १४ मे २०२१ रोजी यंत्रात गॅस भरण्यात आला. याची मुदत १४ मे २०२२ पर्यंत होती. यंत्रावरील ‘एक्स्पायरी डेट’ संपून महिना लोटला. वर्षभराची मुदत संपूनही हे यंत्र तसेच भिंतीला टांगून आहेत. मात्र, त्यात नव्याने गॅस भरण्यात आला नाही. येथे आगीची अनुचित घटना घडल्यास कसे नियंत्रण मिळविणार, असा प्रश्न नातेवाइकांकडून उपस्थित केला जात आहे.
हे यंत्र शोभेची वस्तू
वर्षभरात अग्निशमन यंत्र बदलविणे आवश्यक आहे. पण, तसे न केल्याने ते मुदतबाह्य झाले आहे. भिंतीवर टांगलेले हे यंत्र शोभेची वस्तू ठरत आहे. यापूर्वी शॉर्ट सर्किटमुळे मेडिकलमध्ये आगीच्या घटना घडल्या आहेत. दररोज येथे डॉक्टर, परिचारिका, निवासी डॉक्टरांसहित नातेवाइकांची वर्दळ असते. तरीही अग्निशमन यंत्रांची तपासणी होत नाही. हा मेडिकलच्या ढिसाळ प्रशासनाचा हा उत्तम नमुना असल्याची चर्चा येथे रंगली आहे.
Web Title: Nagpur Pediatric Department Fire Extinguisher Expired
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..