नागपूरकरांनी अनुभवली रस्त्यावरची शाळा; गडकरींनीही ऐकले गाऱ्हाणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin Gadkari
समृद्धी महामार्गासाठी शाळा पाडली; गडकरी विद्यार्थ्यांना म्हणाले, हे बघा..

समृद्धी महामार्गासाठी शाळा पाडली; गडकरी विद्यार्थ्यांना म्हणाले, हे बघा..

नागपूर : समृद्धी महामार्गात तोडलेली आश्रमशाळा पुन्हा नव्या वास्तुसह सज्ज व्हावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते मतीन भोसले यांनी ‘जी जान से’ प्रयत्न केले. परंतु मायबाप सरकारसाठी हा ‘चिल्लर’ विषय. ‘हो’ म्हणून कुणीच काहीही न केल्याने हतबल झालेल्या मतीनच्या मदतीसाठी त्याचे चिमुकले विद्यार्थी आणि पालक सरसावले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(central minister Nitin Gadkari) यांना गळ घालण्यासाठी सोमवारी त्यांच्या घरापुढे ‘रस्त्यावरची शाळा’ भरवत अभिनव आंदोलन केले.

हेही वाचा: पती, मुलांसमोर भावाने केला सख्या बहिणीचा खून; कौटुंबिक वाद

फासेपारधी समाजासाठी अनेकदा रस्त्यावर उतरणाऱ्या मतीन भोसले यांच्या अनुपस्थितीत हे आंदोलन फासेपारधी समाजाची वाघीण म्हणून परिचित असलेल्या नांदेड येथील सामाजिक कार्यकर्त्या शीला शिंदे यांनी पेलले. जोडीला प्रतिभा धर्मराज भोसले याही होत्या. विद्यार्थ्यांना जण गण गाताना, संविधान प्रास्ताविका वाघरी भाषेत म्हणताना आणि वंदेमातरमच्या सामूहिक घोषणा देताना पाहून वर्धा मार्गावरील गडकरी यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेसाठी सज्ज असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी अत्यंत समंजसपणे परिस्थिती हाताळली. निवेदन देण्यासाठी सामोऱ्या आलेल्या शीला शिंदे, प्रतिभा भोसले यांच्या मागण्या नितीन गडकरी यांनी ऐकल्या. त्यानंतर स्वतःहून खाली बसललेल्या चिमुकल्यांकडे ते गेले. त्यांच्याशी बोलले. ‘‘हे बघा, समृद्धी महामार्ग हा राज्य सरकारचा विषय आहे. केंद्रातील विषय असता तर मी आताच निर्णय घेतला असता. तरीही मी राज्य सरकारला याबाबत पत्र लिहितो.’’ साक्षात गडकरीच बोलल्यामुळे विद्यार्थ्यांनी आनंदाने टाळ्या वाजविल्या.

हेही वाचा: नागपूरात चिमुकल्यासह चौघांना ओमिक्रॉन; १३३ जण कोरोनाच्या विळख्यात

अत्यंत शांतपणे निघालेल्या आंदोलक विद्यार्थ्यांचा जत्था मग काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या रहाटे काॅलनीतील निवासस्थानी गेला. पुन्हा रस्त्यावर शाळा भरली. राष्ट्रगीत, संविधान प्रास्ताविका आदी सर्व आटोपले. नाना पटोले यांच्या वतीने त्यांच्या कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांना व्हाट्स अॅपवर निवेदन पाठविले. ‘या विषयावर नक्कीच बैठक लावण्यात येईल’, असे आश्वासन त्यांना मिळाले. हे अभिनव आंदोलन टिपण्यासाठी आलेल्या कॅमेऱ्यासमोर मोठ्या हिंमतीने विद्यार्थी बोलत होते. त्यांच्या प्रश्नांना नेमके उत्तर देत होते. मतीनची कमतरता जाणवू नये, एवढी हिंमत चिमुकले दाखवत होते. इथून पुढे चिमुकल्या आंदोलकांचा जत्था दीक्षाभूमीवर पोहोचला. तिथे बोधीवृक्षाखाली सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा छोटेखानी कार्यक्रमही झाला. सकाळी साडेनऊपासून तब्बल पाच तासानंतर हा क्रांतिकारी जत्था नागभूमीतून अमरावतीकडे रवाना झाला. परंतु ‘मागण्या पूर्ण झाल्या नाही तर लवकरच पुन्हा आंदोलनासाठी येऊ’, असा इशारा जाता जाता देऊन गेला.

मतीन भोसले यांचे विद्यार्थी आंदोलन करीत असल्याचे माहीत होताच नागपूर येथील सामाजिक कार्यकर्ते डाॅ. वासुदेव डहाके, मिलिंद सोनुने, दीनानाथ वाघमारे, रामाजी जोगराणा, बबनराव गोरामन, मुकुंद अडेवार, धीरज भिसीकर, प्रसेनजित गायकवाड आले होते.

हेही वाचा: Kolhapur Crime : नगरच्या प्रेमीयुगलांची कोल्हापुरात आत्महत्या

प्रमुख मागण्या

  1. जमीन गेली. ई क्लासची १० एकर जमीन द्या

  2. शाळेची इमारत पाडली. सुसज्ज इमारत बांधून द्या

  3. विहीर, कंपाउंड वाॅल, वाचनालय आदी बांधून द्या

  4. झालेली नुकसानभरपाई द्या

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top