Police | नागपूर पोलिस अलर्ट; शहरात फ्लॅग मार्च | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूर पोलिस अलर्ट; शहरात फ्लॅग मार्च

नागपूर पोलिस अलर्ट; शहरात फ्लॅग मार्च

नागपूर : अमरावती शहरात उसळलेली दंगल, जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना लक्षात घेता शहर पोलिस दल अलर्ट झाले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस उपायुक्तांच्या नेतृत्वात शहरभर पोलिसांनी ‘फ्लॅगमार्च’ केला. तसेच कोणत्याही स्थितीसाठी शहर पोलिस सज्ज असल्याचे संकेतही पोलिस आयुक्तांनी दिले आहेत.

अमरावती शहरात दोन गट आमने-सामने आले होते. त्यानंतर दुकानांची जाळपोळ झाल्यानंतर पोलिसांनी सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. तणावाची ही स्थिती लक्षात घेता नागपूर शहर पोलिस आयुक्तांनी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस दलाला अलर्ट मोडवर ठेवले आहे. शनिवारी सायंकाळी सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि शहरातील सर्वच पोलिस उपायुक्तांसह सहायक पोलिस आयुक्त दर्जांच्या अधिकाऱ्यांसोबत आयुक्त अमितेश कुमार यांनी तातडीची बैठक घेतली. सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. तसेच शहरातील सर्वच प्रतिष्ठाने, हॉटेल्स, ढाबे सक्तीने वेळेवर बंद करण्याचे निर्देश दिले.

हेही वाचा: ओबीसीच्या आरक्षणाची चेष्टा करु नका; राज्य समन्वयक रमेश बारसकर

शहरातील जवळपास ३१ संवेदनशील ठिकाणांवर शस्त्रधारी पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पोलिस नियंत्रण कक्षात राखीव पोलिस दलाच्या तुकड्या शस्त्रासह सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. फ्लॅगमार्च काढून शहरवासीयांना शांततेचा संदेश पोलिस देणार आहेत. सहा आरसीपी पथके आणि पाच क्युआरटी पथकांना चोवीस तास अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासोबतच शहरातील घडामोडींवर साध्या वेशातील पोलिस लक्ष ठेवून आहेत. धार्मिक संघटनांची संमेलने, राजकीय पक्षांच्या बैठका, कार्यकर्ता मेळावे इत्यादींवर पोलिसांनी ‘वॉच’ राहणार आहे.

अमरावती शहरातील दंगल स्थिती लक्षात घेता मदतीसाठी सहायक पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वात ५ पोलिस निरीक्षक, १० सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षकांसह शंभर पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक अमरावती शहरात पाठविण्यात आले आहे.

हेही वाचा: बागेत मोहोराचे पूजन करताना आंबा बागायतदार संदीप डोंगरे

सोशल मीडियावरही ‘वॉच’

अमरावती शहरात उसळलेल्या दंगलीचे अनेक व्हिडिओ आणि फोटो नागपुरात सोशल मीडियावर फिरत आहेत. प्रक्षोभक आणि हिंसाचाराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवर नागपूर सायबर पोलिसांनी ‘वॉच’ ठेवला आहे. कोणत्याही प्रकारचे हिंसक आणि तथ्यहीन वृत्त सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

loading image
go to top