
नागपूर : पुराचा सामना करण्यासाठी सज्ज राहा
नागपूर : हवामान विभागाकडून मान्सूनचे आगमन वेळेत होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नद्यांच्या पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांमध्ये जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी सज्ज राहण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी आज दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात मान्सूनपूर्व तयारी आढावा त्यांनी घेतला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलिस उपायुक्त बसवराज तेली, महसूल उपायुक्त मिलिंद साळवे, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाचे मुख्य अभियंता आशिष देवगडे, अधीक्षक अभियंता अंकुर देसाई यासह राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे सहायक कमांडर सुरेश कराळे, कृष्णा सोनटक्के, हवामान विभागाचे एम. एल. साहू तसेच दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने (चंद्रपूर), संदीप कदम (भंडारा), संजय मीणा (गडचिरोली) विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.
सिंचन प्रकल्पांमधून पुराचे पाणी सोडताना नदीकाठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा देणारी यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना देताना विभागीय आयुक्त डॉ. खोडे-चवरे यांनी दिल्या. मागील वर्षी पुरामुळे बाधित झालेली गावे तसेच पूर नियंत्रण रेषेनुसार बाधित होणाऱ्या गावांमध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून ‘मॉक ड्रिल’ आयोजित करावे, यासाठी जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणा उपस्थित राहतील, याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.
शाधनांची पूर्तता करा
पूरप्रवण परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक असणारे लाईफ जॅकेट, रबर बोट, सर्च लाईट, मेगा फोन, तंबू, दोर, विजेरी, होंडा पंप, इलेक्ट्रिक जनरेटर, फायर सूट, फोल्डिंग स्ट्रेचर, प्रथम उपचार पेटी इत्यादी अत्यावश्यक साधनांची जिल्हानिहाय माहिती देण्यात आली.
Web Title: Nagpur Pre Monsoon Be Prepared To Face Floods
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..