नागपूर : अंधांना डोळस करणारा ‘रेडिओ अक्ष’

तिसरी ते पदव्युत्तर शिक्षण ऑडिओ रुपात; १३ देशातील अंधांना लाभ
Nagpur Radio Aksha project
Nagpur Radio Aksha project

नागपूर : तंत्रज्ञानाच्या दुरुपयोगाबाबत अनेक नकारात्मक बाबी ऐकायला येत असल्या तरी याच तंत्रज्ञानाचा आधार घेत समाजातील विविध घटक याचा सदुपयोग देखील करताना दिसतात. अंध मुलांना साक्षर करीत समाजात भक्कम स्थान मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलेला ‘रेडिओ अक्ष’ हा प्रकल्पसुद्धा त्यापैकी एक. नागपूरकर संस्थांनी सुरू केलेल्या देशातील या पहिल्या डिजिटल रेडिओचा लाभ १३ देशामधील अंध मुलांना होत आहे.

कोरोना काळात अंध विद्यार्थांची झालेली परवड लक्षात घेता शहरातील सक्षम आणि दी ब्लाइंड रिलिफ असोसिएशनने हा प्रकल्प हाती घेतला. त्यानंतर, पंचवीस ते तीस जणांच्या समुहाने मेहनत घेत नुकतेच डिजिटल स्वरूपात हे रेडिओ माध्यम मुलांना उपलब्ध करून दिले आहे. अंध मुलांचा इयत्ता तिसरीपासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंत सर्व शैक्षणिक अभ्यासक्रम या डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध आहे.

या शिवाय, सर्व स्पर्धा परिक्षांची पुस्तके ऑडिओरूपामध्ये ऐकायला मिळत आहे. शैक्षणिक पुस्तकांशिवाय गोष्टी, कादंबरी, भारतीय शास्त्रीय संगीत आदी एकूण साडेतीनशे ते चारशे पुस्तके ऑडिओ रुपामध्ये साकारण्यात आली आहे. सकाळी ८ ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत व दुपारी ३.३० ते रात्री १० अशा दोन सत्रांमध्ये प्रसारण केले जाते. शिवाय या विशेष मुलांमध्ये सकारात्मकता निर्माण व्हावी म्हणून दर रविवारी कर्तबगार दिव्यांगांची मुलाखत या रेडिओद्वारे ऐकविल्या जाते. रेकॉर्डिंग करण्याकरिता एक मोठा व तीन लहान स्टुडिओ अंध विद्यालयाच्या परिसरामध्ये तयार करण्यात आले.

मराठी हिंदीसह इंग्रजी भाषेतील मोफत असलेल्या या पुस्तकांचा लाभ अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, सिंगापूर, इंडोनेशिया, पाकिस्तान, चिन असे विविध १३ देशातील विद्यार्थी घेत आहे. अंध मुलांनी या पुस्तकांचे आपल्या आवाजात रेकॉर्डिंग करावे, यावर संस्था भर देत आहे.

पन्नाशीवरील गृहिणींच्या हाती धुरा

शिरीष दारव्हेकर या अनुसंधान प्रकल्पाचे संयोजक असून पन्नास वयोवर्षांवरील गृहिणी महिला समन्वयक हा संपूर्ण प्रकल्प हाताळत आहेत, हे विशेष. संपूर्ण तंत्रज्ञानावर आधारित हा प्रकल्प असूनसुद्धा कंटेंटपासून ते अपलोडिंगपर्यंत प्रत्येक काम या महिला कुशलतेने करीत आहेत. घरातील दैनंदिन कामे पूर्ण झाल्यानंतर दुपारच्या वेळेचा सदुपयोग त्या या मुलांसाठी करीत आहेत.

कोरोना काळात अंध मुले शिक्षणापासून दुरावली होती. भविष्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता या डिजिटल रेडिओची संकल्पना अमलात आणली गेली. ॲंड्रॉइडसाठी ‘रेडिओ अक्ष’ व ॲप्पल मोबाईलवर झिनो रेडिओ नावाने ते उपलब्ध आहे.

-शिरीश दारव्हेकर, संयोजक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com