नागपूर : रेल्वे स्थानकावर सुरक्षा धोक्यात

प्रवाशांचा बिनधास्त वावर कंत्राट संपल्याने स्कॅनिंग मशिन काढल्या
Nagpur Railway station Scanning machines removed
Nagpur Railway station Scanning machines removedsakal

नागपूर : कंत्राट संपल्यामुळे संवेदनशील समजल्या जाणाऱ्या उपराजधानीतील मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर गेल्या २५ दिवसापासून ‘बॅग स्कॅनिंग मशिनच नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यामुळे प्रवाशांचे सामान तपासणीविना रेल्वेगाड्यांमध्ये नेण्यात येत आहे. समाजकंटक या संधीचा फायदा घेऊन अनुचित प्रकार घडण्याची किंवा घातपाताची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी मध्यवर्ती रेल्वे स्थानक परिसरातील लोहमार्ग वाहतूक पोलिस बूथजवळ एका बॅगमध्ये ५४ जिलेटिन (स्फोटके) असलेली बॅग सापडल्याने खळबळ उडाली होती. दहशतवाद विरोधी पथक, लोहमार्ग पोलिस, शहर पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बल ही यंत्रणा सतर्क झाली होती. जिलेटीन असलेली बॅग ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर ती कमी तीव्रतेची स्फोटके (फटाके) असल्याचे निष्पन्न झाल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला होता. मात्र, या जागेवर खरोखरच जिलेटिन (स्फोटके) असती आणि रेल्वेगाडीतून नेण्यात आली असती तर मोठ्या घातपाताची शक्यता नाकारता येत नव्हती.

मात्र, आज या रेल्वे स्थानकाची सुरक्षा धोक्यात आली आहे. प्रवाशांच्या बॅगमध्ये काय दडलं आहे, हे तपासणारे बॅग स्कॅनर मशिन गेल्या २५ दिवसांपासून येथे नाही. मुख्यप्रवेद्वाराजवळच ‘बॅग स्कॅनर मशिन’होती. येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांच्या बॅगेची तपासणी याद्वारे केली जात होती. आता ही स्कॅनर मशिनच येथे नसल्याने प्रवासी बिनधास्त स्थानकावरून प्रवास करीत आहे. अशावेळी एखाद्या समाजकंटकाकडून या संधीचा फायदा घेऊन बॅगमध्ये स्फोटके किंवा इतर घातक वस्तू घेऊन जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय रेल्वे स्थानकावर अनुचित प्रकार होण्याची शक्यता बळावते. बॅगांची तपासणी होत नसल्याने लोकं बिनधास्त आतमध्ये शिरून रेल्वेगाडीने प्रवास करीत आहे. प्रवाशांसह रेल्वे स्थानकाचीही सुरक्षा धोक्यात आली आहे.

मध्यवर्ती स्थानक संवेदनशील

नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानक संवेदनशील ठिकाण म्हणून ओळखले जाते. स्थानकाला यापूर्वी उडविण्याची धमकी देण्यात आली आहे. येथे रोज ३८ हजार प्रवाशांची ये-जा असते. दरदिवशी १८० या स्थानकावरून जातात. तर महिन्याला २८० गाड्यांची संख्या आहे. या स्थानकावर ‘व्हीआयपी’लोकांची नेहमीच मांदियाळी असते. छत्तीसगडच्या राज्यपालांची स्टेशनवरून नेहमीच ये-जा आहे. त्यामुळे स्थानकावर व्हीआयपींची मूव्हमेंट नेहमीचीच झाली आहे. नागपूरच्या रेल्वे स्थानकाला ‘हेरिटेज’ बिल्डिंगचा दर्जा मिळाला असून तिची ‘अ’श्रेणीत गणना होते. इतक्या महत्त्वाचे हे नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानक आहे.

बॅग स्कॅनिंग मशिन गेल्या २०-२५ दिवसांपासून रेल्वे स्थानकावर नाही. ही मशिन भाड्याने घेतली होती. त्याचा ३ ते ४ लाख रुपये महिना खर्च होता. आता त्याचा करार संपलेला आहे. नवीन दोन मशिनचा ऑर्डर देण्यात आला आहे. जून महिन्याच्या शेवटपर्यंत त्या मिळण्याची शक्यता आहे. पूर्वी भाड्याची असलेली मशिन लहान होती. त्यामुळे मोठ्या बॅग्ज स्कॅन होत नव्हत्या. आता या दोन मशिन येणार असल्याने ही अडचण दूर होणार आहे.

- आशुतोष पांडे (वरिष्ठ सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com