Nagpur Rain News : उसंतीनंतर पावसाचे दमदार कमबॅक

विदर्भात सर्वदूर पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा, धरणाच्या पातळीत वाढ
nagpur rain news monsoon dam water level increase agriculture farmer
nagpur rain news monsoon dam water level increase agriculture farmerSakal

नागपूर : अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर सुरू झालेल्या पावसाने विदर्भात दमदार कमबॅक केला आहे. शुक्रवारपासूनच अनेक जिल्ह्यात कुठे जोरदार तर कुठे पावसाची रिपरिप सुरू होती.पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी चिंतित होता. या पावसाने मात्र तो सुखावला असून शेतातील पिकांनासुद्धा चांगलीच संजीवनी मिळाली आहे.

निम्न वर्धा, गोसेखुर्द धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर तिरोडा तालुक्यातील एक व्यक्ती नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेला. भंडारा जिल्ह्यातील तीन तालुक्यात जोरदार हजेरी लावली. यामुळे भंडारा, पवनी व लाखांदूर तालुक्याती खोलगट भागात पाणी शिरले आहे. तसेच मध्य प्रदेशातील धरणाचे पाणी सोडले जात असल्याने गोसेखुर्द धरणाची सर्व ३३ दारे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

यामुळे वैनगंगा नदी फुगली असून, प्रशासनाने नदीकाठावरील गावांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. शनिवारी दुपारी १२ वाजतापासून सुरू झालेला पाऊस तीन तासपर्यंत जोरदार बरसला. भंडारा, पवनी व लाखांदूर तालुक्यांत जोरदार पाऊस झाल्याने लहान नाल्यांना पूर आला असून, अनेक ठिकाणी रस्त्यांवर पुराचे पाणी वाहत आहे.

वर्धा जिल्ह्यात सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. शनिवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी १३.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आर्वी तालुक्यात झालेल्या पावसामुळे निम्न वर्धा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने प्रकल्पाच्या ११ दारातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.पावसाच्या आगमनाने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांचा चेहऱ्यावर आनंद दिसून आला.अमरावती जिल्ह्याच्या बहुतेक भागांत शुक्रवारपासून ढगाळ वातावरण असून पावसाची रिपरिप सुरू आहे.

मात्र, या पावसाचा जनजीवनावर कोणताच परिणाम झालेला नाही.सततच्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.गोंदियात शेतजमिनीला भेगा पडण्यास सुरवात झाली होती. धानपीक सुकण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, गुरुवारी रात्रीपासून पुनरागमन करणाऱ्या पावसाने शुक्रवारीदेखील दिलासादायक हजेरी लावली.

आज शनिवारी जिल्ह्याच्या चाैफेर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धानपिकांना जीवदान मिळाले असून, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे. रात्रीच्या पावसामुळे गोंदिया शहरातील अंडर ग्राउंड परिसरात पाणीच पाणी साचले होते. तळ्याचे स्वरूप आले होते. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागला.अकोला जिल्ह्यासह शहरात शनिवार (ता. १९) सकाळ पासून पावसाची रिपरिप पहायला मिळाली.

ढगाळ वातावरण व पावसाच्या हलक्या सरींमुळे दिवसभर वातावरण आल्हाददायक झाल्याचे दिसून आले. ग्रामीण भागात काही ठिकाणी हलका, मध्यम पाऊस झाला. दिवसभर पावसाने जोर धरला नसला तरी त्यामुळे जनजीवन मात्र प्रभावित झाल्याचे दिसून आले. सोयाबीन, कापूस व इतर पिकांसाठी शेतकऱ्यांना अधिक पावसाची आवश्यकता आहे.

गोंदिया : तिरोडा तालुक्यातील चुरडी येथील शालीकराम अधीन प्रजापती (वय ७०) वर्षे हे आज सायंकाळी ४.१५ च्या सुमारास चुरडी नाल्याला आलेल्या पुरात पाय घसरून पडले. त्यांचा शोध लागलेला नाही. उद्या सकाळी जिल्हा शोध व बचाव पथक घटनास्थळी पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

गोसेखुर्द धरणातून विसर्ग सुरू

मध्य प्रदेशात जोरदार पाऊस झाल्यामुळे संजय सरोवर धरणातून पाणी सोडले जात आहे. हे पाणी गोसेखुर्द धरणापर्यंत येण्यास सुमारे ४० तास लागतात. तसेच जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता असल्यामुळे आज गोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दारे उघडण्यात आली आहेत. यात सात दारे एक मीटर आणि २६ दारे अर्धा मीटर उघडून ४५३ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे पवनी व लाखांदूर तालुक्यात वैनगंगेचे पात्र फुगले असून, चुलबंदसह अन्य सहयोगी नद्या व नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावातील नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com